“त्यांचे पक्षात स्थान काय?” पृथ्वीराज चव्हाणांच्या टीकेला शरद पवारांचे प्रत्युत्तर

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भाजपच्या संपर्कात असल्याचे विधान केले होते. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये लवकरच बिघाडी होणार अशा चर्चा होऊ लागल्या होत्या. पण त्यांच्या या टीकेला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Congress leader Prithviraj Chavan Gave reply to Sharad pawar over Criticism

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षाध्यक्ष पदावरून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राज्यात विविध चर्चांना उधाण आले होते. याचवेळी त्यांच्यावर अनेकांकडून टीका देखील करण्यात येत होती. शरद पवार यांचा राजीनामा ही त्यांची राजकीय खेळी असल्याचे सांगण्यात येत होते. तर भाजपसोबत हात मिळवणी करण्यासाठी शरद पवार यांनी राजीनामा नाट्य केले असल्याचे सुद्धा बोलले गेले होते. पण त्याचवेळी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भाजपच्या संपर्कात असल्याचे विधान केले होते. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये लवकरच बिघाडी होणार अशा चर्चा होऊ लागल्या होत्या. पण त्यांच्या या टीकेला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Sharad Pawar’s reply to Prithviraj Chavan’s criticism)

हेही वाचा – सामनामधील अग्रलेखाला शरद पवारांचे उत्तर; म्हणाले, “त्यांना काहीही लिहू द्या.”

पृथ्वीराज चव्हाण यांनी कर्नाटक निवडणुकीत प्रचार सभांना हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी निपाणी मतदारसंघात भाषण करताना म्हंटले की, राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपच्या संपर्कात आहे. राष्ट्रवादी ही भाजपची B टीम आहे, त्यांच्या या विधानाबाबत पत्रकारांनी शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, “त्यांच्या पक्षात A, B, C अस स्थान आहे. त्यांना खासगीत भेटा. तिथे त्यांचे काय स्थान आहे हे सांगतील. किंवा त्याच्या सहकाऱ्यांना विचारा,” असा टोला त्यांनी चव्हाणांना लगावला. यावेळी पवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत म्हंटले की, “काहीही काम न करता शब्दाचा खेळ करायचे काही लोकांना जमत.” फडणवीसांनी कर्नाटकातील निपाणी मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करताना म्हंटले होते की, “महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्यांचा एक पक्ष आहे. या पक्षाने आता इथे अख्ख्या कर्नाटकमध्ये त्यांचा एक उमेदवार दिला आहे. तो उमेदवार निपाणी मतदार संघात आहे. हा पक्ष काय डोंबलं करणार आहे इथे येऊन? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पॅक करून पाठवून द्या, आम्ही पाहून घेऊ,” अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे.

महाविकास आघाडी भक्कम आहे. महाविकास आघाडी जागा वाटपबाबत मी मुंबईला गेल्यावर बोलेन. उध्दव ठाकरे आणि नाना पाटोले यांच्याशी बोलेन. त्यानंतर अंतिम निर्णय होईल. तर शेकाप आणि डावे सोबत यावेत यासाठी बोलणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी महाविकास आघाडीबाबत व्यक्त केले आहे.