राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मागील आठवड्यात त्यांच्या पक्षाध्यक्ष पदाच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे राज्यातील चर्चेचा विषय ठरले होते. पण तीन दिवस विचार केल्यानंतर आणि पक्षातील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी त्यांची मनधरणी केल्यानंतर त्यांनी अखेरीस आपला निर्णय मागे घेतला. पण हे सर्व काही ठरवून केल्याचे इतर राजकीय पक्षातील नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. तसेच, ठाकरेंचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून देखील या प्रकरणी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करण्यात आलेली आहे. पण सामनातील अग्रलेखावर शरद पवार यांनी भाष्य करत टीका केली आहे. (Sharad Pawar’s reply to the headline in the SAAMANA) लिहिण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यांना काहीही लिहू द्या. आमच्या पक्षात काय सुरू आहे, हे आम्हाला माहित, अशी प्रतिक्रीया शरद पवार यांनी दिली आहे. पवारांनी साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला हजेरी होती. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
हेही वाचा – महाराष्ट्रात स्केल, स्कॅम आणि सेटिंगचा खेळ! आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री शिंदे, BMC वर घोटाळ्याचे आरोप
शरद पवार हे पक्षाचा वारसदार तयार करण्यास अपयशी ठरले आहेत, असे सामनाच्या अग्रलेखात लिहिण्यात आले होते. त्यांच्या या टीकेला शरद पवार यांनी प्रसार माध्यमांच्या समोर उत्तर दिले. त्यावेळी ते म्हणाले की, “आम्ही काय केले आहे हे त्यांना माहीत नाही. आम्ही पक्षाचे सहकारी अनेक गोष्टी बोलतो. त्यामुळे वेगवेगळी मतं असतात. बाहेर जाऊन त्याची प्रसिद्धी करत नसतो. हा आमच्या घराचा प्रश्न आहे. घरामध्ये आमच्यातला प्रत्येक सहकाऱ्याला ठाऊक आहे की आपला पक्ष पुढे कसा जाणार आहे. उद्या नवीन नेतृत्वाची फळी पक्षात कशी तयार केली जाते. याची खात्री पक्षाच्या प्रत्येक सहकाऱ्याला आहे. त्यामुळे आम्ही नेतृत्व तयार करतो की करत नाही. हे कोणी लिहिलं. याला आमच्या दृष्टीने काहीही महत्त्व नाही. ते लिहितील. त्यांचा लिहिण्याचा अधितकार आहे. आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो,” असा टोला शरद पवार यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
यावेळी त्यांनी 1999मध्ये झालेल्या सत्तास्थापनेचे उदाहरण देत म्हंटले की, 1999 साली काँग्रेस आणि आम्ही मिळून राज्यात सत्ता स्थापन केली. त्यावेळी मंत्रिमंडळ करायचे होते. त्यामुळे त्या नव्या मंत्रिमंडळामध्ये ज्या सहकाऱ्यांना आम्ही सहभागी करून घेतलं. त्यामध्ये जयंत पाटील होते. त्याच्यामध्ये अजित पवार, दिलीप वळसे पाटील, विलासराव देशमुख, आर. आर. पाटील अशी अनेक नवीन नावे होती, ज्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा त्यांना मंत्रिमंडळात घेण्यात आलेले होते. माझी सुरूवात राज्यमंत्रिमंडळापासून झाली होती. त्यानंतर माझी बढती झाली होती. पण जी आता नावे घेतली. ज्या नेत्यांची आता नावे घेतली, त्यांची कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती केल्यानंतर त्या सर्वांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले. त्यामुळे आम्ही नेतृत्व तयार करतो की करत नाही, हे कोणाच्या सांगण्यावरून आम्हाला फरक पडत नाही, असेही शरद पवार म्हणाले.