Breaking: शरद पवारांच्या बंगल्यातील ५ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह; पवार मात्र निगेटिव्ह

Sharad Pawar bodyaguard Coronavirus
शरद पवार यांच्या सुरक्षारक्षकाला कोरोनाचा संसर्ग

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी सुरक्षेसाठी तैनात असलेले सुरक्षा रक्षक बंगल्यातील कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती समोर आली आहे. एकूण पाच कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तसेच शरद पवार यांची देखील कोरोनाची चाचणी करण्यात आली होती, ती निगेटिव्ह आली असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. आता पुढील काही दिवस राज्याचा दौरा करु नका अशी विनंती आम्ही पवार यांना करणार असल्याची प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे.

शरद पवार यांची ब्रीच कँडी रुग्णालायत चाचणी करण्यात आली असून त्यांच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सिल्व्हर ओकवरील कर्मचाऱ्यांची रॅपिड टेस्ट करण्यात आली होती. यामध्ये हे कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत. शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक यांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मात्र त्यांचे कोरोना रिपोर्ट अद्याप आलेले नाहीत.

शरद पवार यांनी पार्थ पवार बद्दल केलेल्या वक्तव्यामुळे पवार कुटुंबियांत मागच्या दोन दिवसांपासून अंतर्गत वाद उफाळून आला असल्याचे बोलले जाते. या वादावर आता सामंजस्याने पडदा टाकण्यात आलेला आहे. त्यासाठीच अजित पवार आणि पार्थ पवार हे बारामती येथे गेले होते. तर शरद पवार देखील पत्नी प्रतिभा पवार यांच्यासमवेत पुणे येथे आलेले होते. त्यानंतर ते काल (रविवारी) रात्री पुण्याहून पुन्हा मुंबईला आले होते.

कोरोना विषाणूने महाराष्ट्राला विळखा घातला असून त्यावर मात करण्यासाठी शरद पवार हे स्वतः गेल्या काही दिवसांपासून राज्यभर दौरे करत आहेत. सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासमवेत त्यांनी सोलापूर, नाशिक, सातारा, रायगड जिल्ह्यात जाऊन कोरोना विरोधातील लढाईचा आढावा घेतला होता.