लोकसभेला महाविकास आघाडी झाल्यास पवार पंतप्रधान होतील – रोहित पवार

rohit pawar and sharad pawar
शरद पवार २०२४ साली पंतप्रधान होऊ शकतात - रोहित पवार

महाराष्ट्रात महाविकास आघाडी झाल्यामुळे राज्याचा विजय सोपा झाला. २०२४ साली लोकसभेला देखील जर महाविकास आघाडी झाली आणि मराठी माणूस पंतप्रधान झाला तर आपल्या सर्वांचे स्वप्न पुर्ण होऊ शकते, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी केले आहे. औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप सोळुंके यांच्या कार्यगौरव सोहळ्यात बोलत असताना रोहित पवारांनी हे वक्तव्य केले.

रोहित पवार म्हणाले की, पवार साहेब अजून तरूण आहेत. राज्याप्रमाणेच जर २०२४ लोकसभेत महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढली तर मराठी माणूस पंतप्रधान पदावर बसू शकतो. लोकांचा पवार साहेबांवर विश्वास आहे आणि पवार साहेबांचा जनतेवर विश्वास आहे. जर लोकांवर विश्वास नसेल तर स्टेजवर पत्रकाराशी बोलताना स्वतःचेच बुट स्वतःच्या हातात घेऊन उभे राहावे लागते, असे सांगत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील रोहित पवार यांनी टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप सोळुंके यांनी शिक्षकाची नोकरी सोडून २४ तास समाजसेवा करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल रोहित पवार यांनी प्रदीप सोळुंके यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबतच शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे देखील उपस्थित होते.