शर्मिष्ठा वालावलकर : कणखर क्षेत्रातील संवेदनशील अधिकारी

कुटुंब सांभाळून पोलीस दलात काम करताना तारेवरची कसरत करावी लागते. पोलीस विभाग पुरुषप्रधान आहे. जर गुणवत्ता असेल तर संधी मिळत जातात. महिलांमध्ये अधिक काम करण्याची तयारी असते. क्राईम ब्रॅचमध्येही असतानाही आव्हानात्मक कामे करावी लागली. ती कामे संधी समजून करत गेले. त्यात यश आले. परिणामी, अडचणींवर मात करता आली, संवेदनशील महिला पोलीस अधिकारी असल्याने मुलगा आजारी असतानाही सर्वप्रथम कर्तव्याला प्राधान्य दिले. लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी खास ‘आपलं महानगर’च्या वाचकांना सांगितली त्यांच्या संघर्षाची कहाणी… 

वालावलकर म्हणाल्या की, मूळची सांगली शहरातील मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. कुटुंबात आठ भाऊ आहेत. मुलांमध्ये मोठेच झाले. मुलगी म्हणून कोणीही वेगळी वागणूक दिली नाही. आई-वडिलांनीसुद्धा भेदभाव केला नाही, निर्णय स्वातंत्र्य दिले. शालेय जीवनातच पोलीस अधिकारी होण्याचे ठरविले होते. युनिफॉर्म हा एकच ऑप्शन होता. १२ वीपासून वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये सहभागी व्हायचे.इंजिनिअरींगला प्रवेश मिळत असताना घेतला नाही. बी. एस्सी.चे शिक्षण करत साईड बाय साईड स्पर्धा परीक्षेची तयारी केली. २००६ मध्ये एमपीएससीची पोलीस उपअधीक्षक पदाची परीक्षा दिली. त्यात पास झाले.

२००६ मध्ये एमपीएससीची परीक्षा दिली असली तरी २०१० मध्ये निकाल आला. आत्ता तरी स्पर्धा परीक्षेला वेळापत्रक आहे. पूर्वी वेळापत्रक नव्हते. स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरला तेव्हा वेगळी होते आणि २०१० मध्ये स्पर्धा परीक्षेचा निकाल आला तेंव्हा एका मुलाची आई होते. ४ वर्षांनी स्पर्धा परीक्षेचा निकाल आला होता. त्यामुळे कधी वाटायचे खरेच सिलेक्ट झाले आहोत का. तो काळ अस्वस्थतेचा होता. पोलीस उपअधीक्षक पदाचे ट्रेनिंग नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये झाले आहे. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस दलात प्रोबेशन झाले. या ठिकाणी पोलीस अधिकार्‍यांनी चांगले शिकवले. पहिले पोस्टींग उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरला पोलीस उपअधीक्षक म्हणून झाले. या ठिकाणी नवरात्रोत्सव निर्विघ्नपणे पार पाडणे मोठे आव्हानात्मक असते. नवरात्रोत्सवासाठी १७०० पोलीस व ३०० पोलीस अधिकारी २१ दिवस बंदोबस्तासाठी तैनात असतात. नवरात्रोत्सवात तुळजापूरला तेलंगणामधील भाविक चालत येतात. शिवाय, मुख्यमंत्र्यांसह व्हिआयपी देवीच्या दर्शनाला येतात. त्यावेळी नवरात्रोत्सव निर्विघ्नपणे पार पाडणे कौशल्ययाचे काम होते.

तुळजापूरला असताना पहिली मोक्का कारवाई केली. त्यातील आरोपी आजही तुरुंगात आहेत. तुळजापूरनंतर सोलापूर शहरात सहायक पोलीस आयुक्त म्हणून आले. त्यावेळी महाराष्ट्रात पहिल्यांदाच गुन्हे विभागात महिला पोलीस अधिकारी एसीपी म्हणून रुजू होणार होते. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. पोलीस आयुक्तांना महिला पोलीस अधिकारी म्हणून संधी द्या. चार महिन्यांत सिद्ध झाले नाही तर कोठेही संधी द्या, मिळेल ते काम करे, असे सांगितले. प्रत्यक्षात चार वर्षे सोलापूर शहरात क्राईम एसीपी होते. या कालावधीत सर्वाधिक घरफोड्या, सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले. २८ एमपीडीएअंतर्गत सराईत गुन्हेगारांवर कारवाया केल्या. लाखो रुपयांचा चोरीचा मुद्देमाल परत मिळवले. फसवणुकीच्या एका गुन्ह्यामध्ये तब्बल ३५ कोटी रुपयांची रिकव्हरी केली आहे. महिला सेलमध्ये असताना कोणार्क एक्सप्रेसमधून ११ अल्पवयीन मुलींना नेले जात असल्याची माहिती मिळाली. ही एक्सप्रेस सोलापूर रेल्वेस्थानकात २० मिनिटांत येणार होती. शिवाय, ही एक्सप्रेस फक्त ५ मिनिटे सोलापूरला थांबते. ऑपरेश मुस्कानअंतर्गत चोर पोलिसांना सोबत घेऊन रेल्वेतून ११ मुलींची सुखरुप सुटका केली.

तीन महिन्यांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक विभागाचा पदभार स्विकारला. ५७ दिवसांत २८ छापे टाकून लाचखोरांच्या मुसक्या आवळल्या. या कामात टीमवर्क आहे. सर्वांना स्पेशल ब्रँचमध्ये असल्याची जाणीव करून दिली. जेव्हा केंव्हा गरज पडेल तेव्हा सर्व अधिकारी कारवाईसाठी उपस्थित राहतात. कारवायांमुळे लोकांचा विश्वास बसला. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारींचा ओघ वाढला आहे. अनेक छापे शनिवारी व रविवारीसुद्धा केले आहेत. कायदेशीर कामांसाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नाही. कोणी सरकारी अधिकारी पैसे मागत असेल तर तक्रार करा. संबंधित अधिकार्‍यावर तात्काळ कारवाई केली जाईल. अजूनही समाज स्थित्यंतर अवस्थेत आहे. शिक्षणासाठी कुटुंबाची मदत मिळत आहे. मुलींनी शिक्षणाच्या संधीचा उपयोग केला पाहिजे. प्रत्येक महिलेने आर्थिकदृष्ठ्या स्वतंत्र असले पाहिजे. महिलेने कोणावरही अवलंबून राहू नये. स्वत: कामवत्या झाल्या पाहिजे. मल्टीटासकींग महिलांमध्ये आहे. महिलांनी स्वत:ला सिद्ध केले पाहिजे. कोणीही अन्याय सहन करु नये. अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. मुझे ओ रानी की तरह रखेगा असे न म्हणता प्रत्येक महिलेने स्वत:चे राज्य स्वत: तयार करावे. जागतिक महिला दिनानिमित्त महिलाना संदेश देऊ इच्छिते की, आपले स्त्रीपण मिरवले पाहिजे. महिलांनी सक्षम व्हावे. शोषित होवू नये. दुसर्‍यांना मदत करावी. आयुष्य खूप सुंदर आहे.

मुलगा आजारी, तरी वर्दीला प्राधान्य –

मुलाला डेग्यू झाल्याने तो रुग्णालयात अ‍ॅडमिट होता. त्याचवेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. डोळ्यातून आश्रू आले असतानाही सर्वप्रथम कर्तव्याला प्राधान्य द्यावे लागले. खूनाची घटना घडल्याचे समजताच घटनास्थळी जाणे बंधनकारक असते. त्यामुळे रात्री दीड वाजता मुलाला कारमध्ये झोपवले आणि कारने घटनास्थळाजवळ गेले. त्यावेळी कारचालकाने मुलगा कारमध्ये असल्याने खूनाच्या घटनेजवळ कार नेण्यास नकार दिला. त्यावेळी कारचालकाचा राग आला पण ते वडिलकीच्या नात्याने त्यांचे म्हणणे पटले. शेवटी कारमधून उतरतून खून झाल्या त्या ठिकाणी जात पाहणी केली.

अत्याचाराच्या घटनेमुळे मन हेलावले –

नाशिक जिल्ह्यात सहा वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्यानंतर तिला नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ आणले होते. तिला भेटण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गेले होते. अल्पवयीन असल्याने तिला काहीच समजत नव्हते. तिला काय चालू तेसुद्धा समजत नव्हते. तिला पाहून अत्यंत वाईट वाटले. कर्तव्याचा भाग म्हणून तिच्याशी बोलावे लागले. ती मुलगी आहे म्हणून ती कोणाच्या तरी वासनेची बळी पडली होती. हा प्रसंग मन हेलावून टाकणारा होता.

कायम आठवणीत राहणारा प्रसंग –

पोलीस दलात १३ वर्षांपासून काम करत आहे. कोल्हापूरमधील एका शाळेची सहल तुळजापूरला आली होती. तुळजापूरजवळ एका ट्रकने स्कूलबसला जोरदार धडक दिली. या अपघातात स्कूलबसची एक बाजू कापली होती. त्यात ८ ते १० वयोगटातील सात मुलांचा जागीच मृत्यू झाला होता तर इतर मुले जखमी झाली होती. हा प्रसंग आजही डोळ्यासमोर आहे..आणखी एक प्रसंगी नाशिक ग्रामीण पोलीस दलात असताना कोरोनाचा उद्रेक झाला होता तेव्हाचा. तत्कालीन पोलीस
अधीक्षक आरती सिंह यांच्यासोबत कामकाज केले. त्यावेळी एका पोलीस अंमलदाराने आपल्याला श्वास घेता येत नसल्याचे सांगितले. कोरोनाची पहिली लाट असल्याने काय करायचे समजत नव्हते. मॅडम, मला वाचवा. मला मरायचे नाही, असे ते म्हणत होते. तीन दिवसांनी त्या अंमलदारांचा मृत्यू झाला. हा प्रसंग कधीही विसरू शकत नाही.