संभाजी ब्रिगेडसोबतची युती शिवसैनिकांच्या मनाला वेदना देणारी, शीतल म्हात्रेंचा हल्लाबोल

जातपातीचं राजकारण करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी ब्रिगेडसोबत शिल्लक सेनेने केलेली युती ही सर्वसामान्य शिवसैनिकासाठी अत्यंत वेदनादायक असल्याचं मत शिवसेनेतील शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी व्यक्त केलं आहे. संभाजी ब्रिगेड ही नक्की कुणाची बी टीम आहे हे माहीत असूनही ही युती करणं हे अनाकलनीय असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

ज्या विचारामधून संभाजी ब्रिगेडचा जन्म झाला आणि ज्यांच्या पाठबळावर ही संघटना विस्तारली त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत त्यांनी युती करायला हवी होती मात्र तसे न करता त्यांनी शिल्लक सेनेसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय हा नक्की कुणाच्या सांगण्यावरून घेतला असेल हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो, असे शीतल म्हात्रे म्हणाल्या.

संभाजी ब्रिगेडसोबत युती करून ज्या प्रबोधनकार ठाकरे आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जात पात विरहित राजकारण करण्याच्या परंपरेला छेद देण्याचा केलेला प्रयत्न सर्वसामान्य शिवसैनिकाला निश्चितच पटला नसेल, असे शीतल म्हात्रे म्हणाल्या.

युती सरकार सत्तेत असताना स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याविरोधात ज्या ब्रिगेडने उच्च न्यायालयात धाव घेतली त्यांना सोबत घेण्याचा शिल्लक सेनेचा निर्णय निश्चितच भूषणावह नाही असे मतही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले आहे.

उद्धव ठाकरेंमध्ये दम नाही..,नवनीत राणांची टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संभाजी ब्रिगेड संघटनेशी युती केली. त्यावरुन अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यात दम नाही. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांच्यात दम असता तर ते असं घरात बसले नसते, अशी टीका नवनीत राणा यांनी केली आहे.


हेही वाचा : उद्धव ठाकरेंमध्ये दम नाही.., शिवसेना संभाजी ब्रिगेड युतीवरुन नवनीत राणांची जहरी टीका