घरताज्या घडामोडीमुंबई महापालिकेत शिवसेनेचे कार्यालय ताब्यात घेण्यासाठी शिंदे आणि उद्धव ठाकरे गट भिडले

मुंबई महापालिकेत शिवसेनेचे कार्यालय ताब्यात घेण्यासाठी शिंदे आणि उद्धव ठाकरे गट भिडले

Subscribe

शिवसेनेत बंडखोरी होऊन राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता शिवसेनेची कार्यालये, शाखा ताब्यात घेण्यावरून राज्यात विशेषतः ठाणे, कल्याण, डोंबिवली नंतर आता मुंबई महापालिकेत शिवसेना पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे खासदार, माजी नगरसेवक, माजी महापौर आणि उद्धव ठाकरे गटाचे विभाग प्रमुख, माजी नगरसेवक पदाधिकारी, कार्यकर्ते बुधवारी एकमेकांना भिडले. दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी झाली. शाब्दिक चकमकही झाली. त्यामुळे पक्ष कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तब्बल एक तास दोन्ही गटांमधील चकमक झाली.

मात्र सदर घटनाप्रकार हाणामारीपर्यंत पोहोचण्यापूर्वी स्थानिक पोलीस व पालिका सुरक्षारक्षक यांनी प्रथम मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र नंतर दोन्ही गटाला धक्काबुक्की करीत कार्यालयाबाहेर काढले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
मुंबई महापालिकेची मुदत संपल्याने आजी नगरसेवक माजी नगरसेवक झाले. मात्र निवडणूक होईपर्यंत पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, सर्वच पक्षांच्या माजी नगरसेवकांना व गटनेते आदि. पक्ष कार्यालय उठबस करण्यासाठी खुले ठेवले होते. मात्र राज्यात एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री व आमदार उद्धव ठाकरे यांच्यातील आरोप – प्रत्यारोप, गटबाजी दिवसेंदिवस वाढीस लागले आहे.

- Advertisement -

विधिमंडळ अधिवेशनातही दोन्ही गटांत आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत. एकमेकांवर टीकास्त्र सोडणे, तोफ डागणे जोरात सुरू आहे. डोंबिवली, ठाणे, कल्याण आदी ठिकाणी शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून दोन्ही गटांत हाणामारीपर्यँतच्या घटना घडल्या. आता त्याचे लोण मुंबईपर्यन्त पोहोचले आहेत. मुंबई महापालिकेत शिवसेनेचे पक्ष कार्यालय आहे. हे शिंदे गटाने ताब्यात घेऊ नये यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून पत्रकार परिषद घेणे सुरू करण्यात आले. तर गेल्या दोन आठवड्यापासून उद्धव गटाचे माजी नगरसेवक दररोज या पक्ष कार्यालयात येऊन बसू लागले व चर्चा वगैरे करू लागले.

हे सर्व सुरू असतानाच बुधवारी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे, उपनेते यशवंत जाधव, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, प्रवक्त्या शीतल म्हात्रे आदींनी मुंबईतील विकासकामांच्या निमित्ताने आज पालिका मुख्यालयात आयुक्त इकबाल चहल यांची भेट घेतली. त्यानंतर या सर्वांनी पालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयात जाऊन ठाण मांडले. त्यावेळी पक्ष कार्यालयात फक्त कर्मचारी वगळता उद्धव ठाकरे गटाचे कोणीही उपस्थित नव्हते. मात्र या घटनाप्रकाराची माहिती मिळताच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ, आशिष चेंबूरकर, माजी नगरसेवक सचिन पडवळ, रमाकांत रहाटे, सदानंद परब आदींनी पक्ष कार्यालयात धाव घेतली.

- Advertisement -

उद्धव ठाकरे गट आक्रमक झाल्याने वादाला तोंड फुटले

विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ हे आले व तेवढ्यात शिंदे गटाचे राहुल शेवाळे व यशवंत जाधव हे पक्ष कार्यालयातून बाहेर पडत असताना पाहताच त्यांचा पारा चढला. हिंमत असेल तर आम्ही आलो असताना कार्यालयात घुसून दाखवा ना ?
तेवढ्यात राहुल शेवाळे यांनी, ‘तुम्ही बसा आम्हीही बसतो’, असे सांगत उत्तर दिले. दरम्यान, दोन्ही गट पक्ष कार्यालयात जमले. शिंदे गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले. यशवंत जाधव, शीतल म्हात्रे व माजी नगरसेवक पुन्हा कार्यालयात आले. त्यानंतर उद्धव गटाकडून चेंबूरकर, सकपाळ, सानप, पडवळ यांनी शिंदे गटाला सूनवायला सुरुवात केली. त्यावेळी, पोलीस व पालिका सुरक्षारक्षक दोन्ही गटाची समजूत काढून मध्यस्थी करण्याचा व वाद टाळण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी, हे पक्ष कार्यालय आमचे असून आम्हीच येथे बसणार असे ठामपणे शिंदे गट, पोलीस व पालिका सुरक्षारक्षकांना सांगितले. तर शिंदे गटानेही शिवसेना आमची असून या कार्यालयात आम्ही बसणारच, अशी भूमिका घेतली.

त्याचवेळी, शिंदे गटाचे लोक आक्रमक झाले. शिंदे गटाने, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विजय असो’ अशा घोषणाबाजीला सुरुवात केली. त्यावर उद्धव गटानेही ‘उद्धव ठाकरे यांचा विजय असो’, ‘मुंबई आमच्या साहेबांची नाही कोणाच्या बापाची’, ‘५० खोके एकदम ओके’. अशा घोषणा देत प्रत्युत्तर दिले. तसेच, शिंदे गटाने आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता ‘ए यू’ अशा वादग्रस्त घोषणा दिल्याने वादाला आणखीन तोंड फुटले. घटनाप्रकार शाब्दिक चकमकी वरून हाणामारीपर्यन्त जाऊ नये, यासाठी पोलीस व पालिका सुरक्षारक्षक यांनी अखेर आक्रमक भूमिका घेत दोन्ही गटाच्या माजी नगरसेवकांना व पदाधिकारी यांना पक्ष कार्यालयाबाहेर काढले व तणावाचे वातावरण निवळले. पोलीस आणि पालिका सुरक्षारक्षकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

हिंमत असेल तर त्यांनी उद्या शिवसेना कार्यालयात येऊन दाखवावे : पांडुरंग सकपाळ, विभागप्रमुख, उद्धव ठाकरे गट
४० चोरांचे काही सोबती, षंढ लोक गुपचूपपणे आमच्या पालिकेतील पक्ष कार्यालयात घुसले होते. तेव्हा आम्ही कोणी नव्हतो. चोरासारखे पक्ष कार्यालयात कसे काय येता ? आम्ही आल्यावर त्यांना विरोध केला. अखेर ते बाहेर गेले आम्ही पालिकेतच आहोत. आमचे चॅलेंज आहे त्यांना. त्यांच्यात जर हिंमत असेल तर उद्या पुन्हा पक्ष कार्यालयात येऊन दाखवावे.

आयुक्त निर्णय घेतील : आशिष चेंबूरकर, विभागप्रमुख, उद्धव ठाकरे गट

पालिकेची मुदत संपली असली तरी आयुक्त यांनी, पक्ष कार्यालय वापरायला परवानगी दिली आहे. त्यामुळे आमचे माजी नगरसेवक या शिवसेना पक्ष कार्यालयात येतात. मात्र ते कोणी येत नव्हते. ते आज आयुक्त यांना भेटण्याच्या नावाखाली आज पक्ष कार्यालयात घुसले. आता आम्ही त्यांना कडाडून विरोध केला. आता आयुक्त निर्णय घेतील.

बाळासाहेबांच्या शिवसेनेचेच कार्यालय : यशवंत जाधव, उपनेते, माजी नगरसेवक , शिंदे गट

मी स्थायी समिती अध्यक्ष असताना पक्ष कार्यालयाच्या उभारणीसाठी प्रयत्न केले. आमची शिवसेना ही हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असून त्यांच्या जीवावरच आम्ही नगरसेवक पदी निवडून आलो. त्यामुळे हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचेच पक्ष कार्यालय असून यापुढेही आम्ही पक्ष कार्यालयात येणार व नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करणारच.

बाळासाहेबांच्या विचारांशी त्यांनी गद्दारी केली : नरेश म्हस्के, माजी महापौर शिंदे गट

आमची शिवसेना ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना आहे. मात्र त्यांनी ( उद्धव ठाकरे गट) बाळासाहेबांच्या विचारांशी, हिंदुत्वाशी गद्दारी केली आहे त्यांना या पक्ष कार्यालयात बसण्याचा काहिच अधिकार नाही. आम्ही आयुक्तांकडे भेटायला आलो होतो.


हेही वाचा : खोटे पुरावे देऊन षडयंत्र रचण्याचा प्रयत्न, २०० कोटी घोटाळ्याविरोधात उदय सामंतांचं स्पष्टीकरण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -