शिंदेंना बाजूला सारून ठाकरेंची युतीची तयारी होती, दीपक केसरकर यांचा गौप्यस्फोट

ठाकरे यांनी पदापेक्षा मोदी यांच्याशी असलेले संबंध जपण्याला प्राधान्य देण्याचे ठरवले होते. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी पदत्यागाची तयारी ठेवली होती

deepak kesarkar narayan rane

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन देणारे आम्ही आमदार गुवाहाटीला असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना बाजूला करा. मी भाजपसोबत युती करायला तयार आहे, असा प्रस्ताव दिला असल्याचा गौप्यस्फोट शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शुक्रवारी केला. मात्र, शिंदेना बाजूला करण्याचा प्रस्ताव आम्हाला आणि भाजपलाही मान्य नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या बदनामीचा प्रयत्न सुरु झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे घराण्याबाबत प्रेम आणि आदर असल्याने  हे प्रकरण त्यांच्यापर्यंत पोहोचल्यावर उद्धव ठाकरे आणि मोदी यांच्यात संवाद सुरु झाला होता. ठाकरे यांनी पदापेक्षा मोदी यांच्याशी असलेले संबंध जपण्याला प्राधान्य देण्याचे ठरवले होते. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी पदत्यागाची तयारी ठेवली होती. मात्र, नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने उद्धव ठाकरे नाराज झाले आणि संवाद थांबला, असा दावाही केसरकर यांनी केला.

केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेनेतील फुटीच्या दरम्यान घडलेल्या काही घटनांचा खुलासा केला. ५० आमदार गुवाहाटीत असताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना बाजूला करा मी भाजपसोबत युतीला तयार आहे, असा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्याला आम्ही आमदार तयार नव्हतो. तसेच भाजपलाही हा प्रस्ताव मान्य नव्हता, असे केसरकर यांनी सांगितले.

केसरकर यांनी यावेळी नारायण राणे यांच्यामुळे युती फिसकटल्याचा दावा केला. नारायण राणे  यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात  आदित्य ठाकरेंची बदनामी केली. राणे पिता-पुत्रांचा आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्यात मोठा वाटा होता. भाजपचे  व्यासपीठ वापरून राणेंनी  आदित्य ठाकरेंची बदनामी केली. त्यासाठी राणे यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. याबाबत पंतप्रधान मोदी आणि भाजप यांच्यासोबत संपर्क केला. मी पंतप्रधानांना याबाबत वैयक्तिक संपर्क करण्याचा प्रयत्न केला. यावर पंतप्रधानांनी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधानांच्या मनात बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे घराण्याबाबत प्रेम आणि आदर असल्याचे  दिसून आले . हे प्रकरण पंतप्रधानांपर्यंत पोहोचल्यावर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात संवाद सुरु झाला आणि त्यानंतर दोघांची भेट झाली, असे केसरकर म्हणाले.

पंतप्रधान मोदींसोबत असलेले संबंध जपण्याला उद्धव ठाकरे  यांची तयारी होती. पण नारायण राणे  यांना केंद्रीय मंत्रिपद दिल्याने  ठाकरे नाराज झाले आणि संबंध बिघडले. आदित्य ठाकरेंची  बदनामी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग करण्याचे ठरवले होते, असेही त्यांनी सांगितले. भाजप आणि शिवसेनेत युतीची बोलणी सुरु असताना विधानसभेत भाजपच्या १२  आमदाराचे  निलंबन झाले . यामुळे भाजप आणि शिवसेनेतील संबंध बिघडले.  भाजप आणि शिवसेनेतील संबंध सुधारण्याची उद्धव ठाकरेंची तयारी होती. पण नंतरच्या काळात वेळेअभावी ते झाले  नाही आणि संबंध आणखी बिघडले’, असेही दीपक केसरकर म्हणाले.


हेही वाचाः ‘रडायचं नाही लढायचं’, संजय राऊत यांचे विरोधी पक्षांना पत्र