मराठवाड्याच्या प्रश्नाबाबत शिंदे फडणवीस सरकार गंभीर नाही, अंबादास दानवेंची टीका

Ambadas Danve Criticism of the state government over the budget
संग्रहित छायाचित्र

मुंबई : मराठवाड्यातील ज्वलंत प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मराठवाड्याचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे, मात्र सरकार मराठवाड्याच्या प्रश्नाबाबत गंभीर दिसत नाही, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मराठवाडा स्वातंत्र्य संग्रामाच्या अमृत महोत्सवी चर्चेत सहभागी होताना केली.

मराठवाड्यामध्ये सरकारचं जेवढं पाहिजे तेवढं लक्ष नसल्याने मराठवाड्याचे अनेक प्रश्न जैसे थे आहेत. गेल्या तीन अधिवेशनापासून सभागृहात मराठवाड्याविषयी बोलण्याची मागणी केल्यावर आज कुठे बोलण्याची संधी लाभल्याचे सांगत दानवे यांनी सरकारला फैलावर घेतले.

“राज्य सरकारने मराठवाड्याच्या विकासासाठी ठोस पावले उचलली नाहीत. १७ सप्टेंबर २०२२ला मुख्यमंत्री यांनी मराठवाडयाच्या विकासासाठी अनेक घोषणा केल्या मात्र त्याची पूर्तता केली नाही,” अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

मराठवाड्यातून सर्वात जास्त ऊसतोड कामगार हे राज्यात जात असतात. मराठवाड्यातील रखडलेला सिंचन प्रकल्प, जायकवाडी धरणाची प्रलंबित दुरुस्ती, काही जिल्ह्यात असलेला उद्योगधंद्याचा अभाव, पाणी प्रश्न, साखर कारखान्यांना मिळणाऱ्या मदतीत होणारा भेदभाव आदी मुद्द्यांवरून दानवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच मराठवाड्याच्या विकासासाठी स्थापन केलेल्या वैधनिक विकास महामंडळाचे काय झाले याचे मूल्यमापन होण्याची गरज असल्याचे मत दानवे यांनी व्यक्त केले.

मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे यासाठी प्रस्तावित वॉटरग्रीड प्रकल्प चांगला असून याला गती मिळणे आवश्यक आहे, अशी सूचना त्यांनी केली. मराठवाडयातील काही भागातील लोकांना कर्नाटक, तेलंगणामध्ये जावं वाटतं, ही बाब मराठवाडा आणि महाराष्ट्रासाठी नक्कीच भूषावह नाही, त्यामुळे मराठवाडयातील आठही जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, अशी भूमिका दानवे यांनी आज मांडली.

मराठवाडा राज्याचा अविभाज्य अंग असताना त्याच्या विकासासाठी लक्ष देणे आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी नगरमध्ये एक मोठे स्मारक उभारून इतिहास उभा केला. तसेच वंदे मातरम सभागृहात एक इतिहास उभा केला गेला. येणाऱ्या काळात हा क्रांतिकारी इतिहास मराठवाडयाच्या पुढच्या पिढीकडे जाण्याची आवश्यकता असून नवा इतिहास पुढच्या पिढीने निर्माण करण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी सरकारने प्रयत्न करावे, अशी मागणी दानवे यांनी केली.

१९४७ साली मराठवाडा स्वतंत्र झाला. भारताच्या स्वातंत्र्यानंतर एक वर्ष एक महिन्याच्या नंतर मराठवाडा स्वतंत्र झाला. अनेक वर्ष निजामाचे राज्य या मराठवाड्यावर होते. इंग्रजांनी उर्वरित हिंदुस्थानात सुधारणा केल्या; मात्र निजाम मराठवाड्यात केवळ महसूल जमा करण्यासाठी मराठवाड्याचा वापर करत होता. त्यामुळे मराठवाडयाचा विकास खुंटला आणि विकासापासून २०० वर्षे मराठवाडा मागे राहिला. तशीच स्थिती आजही आहे. मराठवाड्याला मोठा धार्मिक वारसा असून मोठी संतांची परंपरा लाभली आहे. तीर्थक्षेत्र, पर्यटन सर्वच क्षेत्रात मराठवाडा सर्वसंपन्न आहे. तरीही मराठवाडयाच्या विकासाकडे सरकारने पाहिजे तितक लक्ष दिलं नसल्याची खंत दानवे यांनी व्यक्त केली.

दानवेंनी काव्यपंक्तीतून मराठवाड्याच्या वैभवाचे केले वर्णन
जगात जर्मनी भारतात परभणी
गोदाच्या पात्राचे नांदेडात पाणी
संभाजीनगर असे पर्यटन राजधानी
धाराशिव जणू तीर्थ वाणी
ओंढा नागनाथ प्रताप सांगे हिंगोली
बीडची शोभा वाढवे परळी
रामदास जन्मभूमी समर्थ जालना
लातूर आहे शिक्षणाचा कणा
अष्टभुजांचा एक मराठवाडा
महाराष्ट्रात जागवी मराठी बाणा…