कृषीमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, गरीबांच्या जमिनी हडपल्याचा आरोप

कृषीमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, गरीबांच्या जमिनी हडपल्याचा आरोप

भाजपच्या पाठिंब्याने सत्तेत आलेले शिंदे गटाचे सरकार सातत्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. हिवाळी अधिवेशनात शिंदे गटातील काही मंत्र्यांवर तर थेट घोटाळ्याचे आरोप झाले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार घोटाळ्यांच्या प्रकरणांमध्ये अडकण्याची शक्यता आहे. यात आपल्या आक्रमक बोलण्यामुळे तर कधी वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेच असलेले शिंदे गटाचे आमदार आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार आघाडीवर आहेत. अधिवेशनात विरोधकांनी सत्तारांना लक्ष्य करत त्यांच्याविरोधात आरोपांची राळ उठवली. तेव्हापासून सत्तार नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. मात्र त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांमुळे आता मुख्यमंत्री शिंदेचं त्यांवर नाराज असल्याची चर्चा आहे. अशात पुन्हा मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर नवा आरोप करण्यात आला आहे. अब्दुल सत्तार यांच्या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा आरोप करण्यात आला आहे.

वाशीम जिल्ह्यातील कथित गायरान घोटाळा, टीईटी घोटाळा आणि सिल्लोड महोत्सवासाठी 15 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात सत्तारांवर आरोपांची राळ उठवली गेली. यानंतर आता सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांनी सत्तारांवर सिल्लोडमधील गरिबांच्या जमिनी बळकावल्याचा गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणी सीबीआय आणि ईडीकडे तक्रार दाखल केली आहे.

शंकरपेल्ली यांनी स्वत: सह पाच शेतकऱ्यांची एकत्रित तक्रार सीबीआयकडे दिल्ली आहे. आशाबाई बोराडे, मुक्तार बागवान, शफीक खा पठाण, कृष्णा कडुबा कापसे, तय्यब बडेमिया खा पठाण अशी तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांची नावं आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीत सत्तार यांच्या मालमत्तेचीही सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या तक्रारीमुळे सत्तारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

यावर तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली म्हणाले की, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सत्तारांवर शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. यात सत्तारांविरोधात आजपर्यंत झालेल्या तक्रारींचाही उल्लेख करण्यात आला आहे. तसेच सत्तारांनी या जमिनी कशाप्रकारे बळकावल्या याचे पुरावेही सादर करण्यात आल्याचे ते म्हणाले,

शंकरपेल्ली पुढे म्हणाले की, मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड तालुक्यातील कित्येक लोकांच्या जमिनी बळकावल्या आहेत. त्यापैकी पाच लोकांसोबत एकत्रित येऊन आम्ही त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे. याप्रकरणी त्यांच्या संपूर्ण मालमत्तेची आणि त्यांच्या संस्थेच्या मालमत्तेतीही चौकशी सीबीआयने करावी अशी मागणी केली आहे. मागील वर्षी 784 पानांचे पुरावे व 22 मुद्दे सादर करत सत्तारांची ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. तर यावर्षी 559 पानांचे अतिरिक्त पुरावे आणि 28 मुद्दे उपस्थित करुन पुन्हा ईडी कार्यालयात चौकशीची मागणी केली, असंही शंकरपेल्ली म्हणाले.

नुकतचं नागपूरमध्ये पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले. यावेळी सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली. वाशीम जिल्ह्यातील कथित गायरान घोटाळा, टीईटी घोटाळा आणि सिल्लोड महोत्सवासाठी 15 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणामुळे सत्तार आधीच अडचणीत सापडले आहेत. अशात शेतकऱ्यांच्या जमिनी हडपल्याच्या आरोपांमुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.


औरंगाबादसह मराठवाड्यातील चार जागांवर भाजपाचे लक्ष; भागवत कराडांची माहिती