राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार गोव्याहून मुंबईला दाखल झाले आहेत. तसेच मुंबई विमानतळावरून दाखल झाल्यानंतर ते ताज हॉटेलमध्ये पोहोचले. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटात सध्या महत्त्वाची बैठक सुरू आहे. शिंदे-फडणवीसांकडून जवळपास १७० आमदारांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. उद्या ३ जुलै आणि ४ जुलै रोजी विधीमंडळांचं अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. यामध्ये फ्लोअर टेस्ट आणि विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू असून बहुमत चाचणी किंवा मंंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
४ जुलै किंवा ५ जुलै रोजी शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदेंच्या मंत्रिमंडाळात कोण-कोण मंत्री होणार?, हे पाहणं महत्त्वाचं आहे. तसेच उद्या विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार असून भाजप आणि महाविकास आघाडीकडून प्रत्येकी एक उमेदवाराला संधी देण्यात आली आहे.
भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे उद्या कोणता नेता बाजी मारणार याकडे लक्ष लागलं आहे. तसेच शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी देखील पक्षातील सर्व आमदारांना व्हीप जारी केला आहे. परंतु आमच्याकडे दोन-तृतीयांश बहुमत असल्यामुळे हा व्हीप जारी करू शकत नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. तर उद्या चमत्कार तुम्हाला विधीमंडळातच दिसेल, असा दावा शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी केला आहे.
दरम्यान, शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांच्याकडून बंडखोर आमदारांना ई-मेलद्वारे व्हीप जारी करण्यात आला आहे. तो व्हीप त्यांना लागू होतो. परंतु तो व्हीप लागू होतो, असं म्हटल्यानंतर त्यांना अपात्र व्हायचं नसेल तर त्यांना मतदान हे मलाच करावं लागेल. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी निवडून येणार, अशी प्रतिकिया राजन साळवी यांनी दिली होती. त्यामुळे शिवसेनेला व्हीप जारी करण्यात आला असून कोणाचा व्हीप मान्य होणार, हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे.
हेही वाचा : ११ दिवसानंतर शिंदे गटाचे आमदार मुंबईत दाखल