कसबा पोटनिवडणुकीबाबत शिंदे गटाची भूमिका काय? दीपक केसरकर म्हणाले… 

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर या ठिकाणी पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या मतदारसंघात होणारी पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी अशी भूमिका आधीच भाजपकडून मांडण्यात आली आहे. असे असतानाच आता शिंदे गटाकडून देखील याबाबत भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. 

deepak Kesarkar

कसबा विधानसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक पार पडणार आहे. याबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी त्यांच्या गटाची भूमिका स्पष्ट केली आहे. कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी शिंदे गट हा भाजपला पाठिंबा देणार असल्याचे केसरकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे भाजपकडून देण्यात येणारा उमेदवार हा या युतीचा अधिकृत उमेदवार राहणार आहे.

शिंदे गटाची भूमिका अधिक स्पष्ट करताना दीपक केसरकर म्हणाले की, शेवटी युती अभेद्य आहे. त्यामुळे योग्य असा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही जागा भाजपाच्या होत्या. युतीचे पालन केले जाईल. भाजपाला पाठिंबा देणार. माझ्या मते ही निवडणुक बिनविरोध झाली पाहिजे. राज्याची आत्तापर्यंतची एक परंपरा आहे. ज्याचे निधन झाले आहे, त्याच्या घरातील उमेदवार उभा राहिला तर निवडणूक बिनविरोध केली जाते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल.

तसेच यावेळी त्यांनी ठाकरे गटातील कार्यकर्त्यांवर देखील टीका केली. आयफोन सहसा कोणाला परवडत नाही, पण आता ठाकरे गटाचे कार्यकर्ते कदाचित तेवढे श्रीमंत झाले असतील, पण माझ्या काळात तर सेनेत वडापाव खाऊन प्रचार करणारे कार्यकर्ते होते, आताचं माहीत नाही, असा खोचक टोला केसरकरांनी ठाकरे गटाला लगावला आहे.

कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक ही बिनविरोध होईल, असे दिसत नाही. या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातून तब्बल 16 जण ही निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाची उमेदवार निवडताना डोकेदुखी नक्कीच वाढणार आहे. तर यामुळे पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ नये, अशी भीती काँग्रेसच्या नेत्यांना लागून राहिली आहे. दुसरीकडे भाजपकडून देखील पाच जण ही निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे समजते. त्यामुळे येत्या काही दिवसांत भाजपच्या पक्षश्रेष्टींकडून एका नावावर शिक्कामोर्तब करण्यात येईल.

हेही वाचा – कोकणात शेकापचा बालेकिल्ला ढासाळला, भाजपाचं कमळ फुललं; बाळाराम पाटील यांचा पराभव

एखाद्या आमदार, खासदार यांच्या निधनानंतर त्या जागेवर त्याच व्यक्तीच्या घरातील एखाद्याला बिनविरोध निवडून द्यावे, अशी परंपरा कायम आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात देखील दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या जागी त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना महानाट्यानंतर बिनविरोध निवडून देण्यात आले. त्यामुळे असेच काहीसे महानाट्य कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत देखील घडते का? हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.