आदित्य ठाकरे केवळ एक साधा आमदार, यापेक्षा जास्त महत्त्व मी त्याला देत नाही – तानाजी सावंत

Tanaji Sawant
तानाजी सावंत

आदित्य ठाकरे हे केवळ एक आमदार आहेत त्यापलीकडे मी त्यांना फार महत्व देत नाही, असे वक्तव्य एकनाथ शिंदे गटाचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांनी केले आहे. आदित्य ठाकरे हे आज पुण्यातील कात्रज चौकात सभा घेणार आहेत. हे ठिकाण तानाजी सावंतांच्या कार्यालयापासून काही अंतरावर आहे. दरम्यान आज पुण्यात मुख्यमंत्री एखनाथ शिंदे यांचा कार्यक्रम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा असून ते तानाजी सावंत यांनाही भेटणार आहेत.

तानाजी सावंत काय म्हणाले –

आदित्य ठाकरे यांची सभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेचा मुहूर्त साधून कात्रज चौकात ठेवण्यात आली का, असा प्रश्न तानाजी सावंत यांना विचारण्यात आला. आदित्य ठाकरे मुद्दाम तुमच्याविरोधात शक्तीप्रदर्शन करत आहेत का, असे सावंत यांना विचारण्यात आले. त्यावर तानाजी सावंत यांनी आक्रमकपणे प्रत्युत्तर देताना म्हटले की, आदित्य ठाकरेंचं शक्तीप्रदर्शन कसलं, त्यांचा तर शक्तीपात झाला आहे. आमची सगळी शक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी आहे. एकही शिवसैनिक त्यांच्या पाठिशी राहिलेला नाही. आदित्य ठाकरे हे कोण आहेत? तो फक्त एक साधा आमदार आहे. यापेक्षा जास्त महत्त्व मी त्याला देत नाही, असे तानाजी सावंत यांनी म्हटले आहे.

ते शिवसैनिक नव्हे तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते –

एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसैनिकांनी पुण्यातील तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. मात्र, माझे कार्यालय शिवसैनिकांनी नव्हे तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फोडले. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भगवे शेले घालून माझ्या कार्यालयात आले होते. त्यांच्यासोबत एक किंवा दोनच शिवसैनिक असतील, असेही तानाजी सावंत यांनी सांगितले.