शपथविधी सोहळ्यात शिंदे गटाच्या मंत्र्यांना पडला बाळासाहेबांचा विसर

cabinet oth taking

शिंदे सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार काल (मंगळवार) राजभवनातील दरबार हॉलमध्ये पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शिंदे गट आणि भाजपकडून प्रत्येकी ९ मंत्र्यांनी शपथ घेतली असून एकूण १८ मंत्र्यांनी गोपनीयतेची शपथ घेतली. परंतु शपथ घेताना शिंदे गटाच्या एकाही मंत्र्याने बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केला नाही. त्यामुळे शिंदे गटाच्या मंत्र्यांना बाळासाहेबांचा विसर पडला की काय?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हा त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा आवर्जून उल्लेख केला होता. उद्धव ठाकरेंची साथ सोडताना बंडखोर आमदारांनी बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा आणि त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही भाजपसोबत जात आहोत, असं बंडखोर आमदारांचं म्हणणं होतं. परंतु त्यांनी शपथ घेताना बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख केला नव्हता.

मंत्रिमंडळ विस्तारात एकूण १८ मंत्र्यांना शपथ देण्यात आली होती. त्यामुळे शिंदे सरकारचे एकूण मंत्रिमंडळ २० झाले आहे. परंतु अजून काही मंत्रिपदे शिल्लक असून दुसऱ्या टप्प्यात मंत्रिमंडळाचा विस्तार पूर्ण होऊ शकतो. तसेच मंत्रिमंडळात एकूण ४३ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी दोन मंत्रिपदं रिक्त ठेवली होती.

राज्य मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेले नाहीये. त्यामुळे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी शिंदे सरकारवर टीका केली होती. तसेच काही आमदारांना टाळता येऊ शकलं असतं, असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला होता. तर राष्ट्रावादी काँग्रेससह इतर नेत्यांनी सुद्धा राज्य सरकार टीकास्त्र सोडलं होतं. मात्र, शिंदे गटातून ज्या आमदारांच्या अपेक्षा कॅबिनेट मंत्रीसाठी लागल्या होत्या. त्यांच्या अपेक्षा भंग झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.


हेही वाचा : ‘फडणवीसांच्या दोन्ही मांड्यांवर पापाचीच ओझी शिंदे गटाने ठेवली; शिवसेनेची टीका