मोदींप्रमाणे उद्धव ठाकरेंनाही दरवर्षी राखी पाठवते; भावना गवळींचं प्रत्युत्तर

shinde group mp bhavana gawali replied to uddhav thackeray criticism on ed enquiry and pm narendra modi rakhi

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यातील शेतकरी मेळाव्यात शिंदे गटावर जहरी टीकास्त्र डागले. यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांनीही टार्गेट केले. आपल्या पलीकडच्या ताईंना धमक्या मिळाल्यानंतर त्यांनी थेट दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधली, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. उद्धव ठाकरेंच्या याच आरोपांना आता भावना गवळींनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. गुवाहाटीला शिंदे गटासोबत शनिवारी कामाख्या देवीच्या दर्शनाला जाताना भावना गवळींनी एका वृत्तवाहिशी बोलताना ठाकरेंवर टीकेची तोफ डागली.

मी यापूर्वीही माझी भूमिका स्पष्ट केली आहे, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज नाही, तर गेल्या अनेक वर्षांपासून राखी बांधतेय. त्यामुळे यावरून कोणीही राजकारण करू नये, हे मी यापूर्वीही सांगितलं आहे. पंतप्रधान मोदींप्रमाणे उद्धव ठाकरेंनाही मी दरवर्षी राखी पाठवते. असा भावना गवळी म्हणाल्या.

माझ्यावर जे आरोप करण्यात आले, त्या प्रकरणी मला न्यायालयातून दिलासा मिळाला आहे. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. संजय राऊतांनाही न्यायालयानेच दिलासा दिला आहे. त्यामुळे कोणीही न्यायालयाच्या निर्णयावर ताशेरे ओढू नये, अशा शब्दात भावना गवळींनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

बुलढाण्यातील शेतकरी मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी भावना गवळींवर पंतप्रधान मोदींना राखी बांधण्यावरून टीका केली होती. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्या पलीकडच्या ताई तुम्हाला माहिती आहेत. शिवसेनेने त्यांना अनेकदा खासदार केले. मात्र या ताईंना धमक्या देण्यात आल्या. मुंबईहून इकडे दलाल पाठवण्यात आले, त्यांच्या चेलेचपाट्यांना अटक झाली, पण ताई मोठ्या हुशार निघाल्या. ताईंनी थेट दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींना राखी बांधली, तो राथी बांधल्याचा फोटो छापून आणला आणि मग तो फोटो छापून आल्यावर ताईंवर कारवाई करण्याची ईडी, सीबीआयवाल्यांमध्ये हिंमत आहे का? त्या तिकडे गेल्यावर त्यांना सर्व आरोपांपासून संरक्षण मिळाले, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.


पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यास मुदत वाढ द्यावी; उमेदवारांची मागणी