शिंदे गट ठाकरे गटाच्या रडारवर, पण भुजबळ, राणे, राज ठाकरेंबाबत भूमिका सौम्य

अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे 'धनुष्यबाण' हे चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात गोठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोन्ही गटाला आता धनुष्यबाण हे चिन्ह तसेच शिवसेना हे पक्षाचे नाव वापरता येणार नाही.

shiv sena new name poster released by uddhav thackeray group

अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात गोठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोन्ही गटाला आता धनुष्यबाण हे चिन्ह तसेच शिवसेना हे पक्षाचे नाव वापरता येणार नाही. त्यामुळे शिंदे गट ठाकरे गटाच्या रडारवर आहे. मात्र, ठाकरे गटाने याआधी शिवसेनेते बंड पुकारलेल्या छगन भुजबळ, नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्याबाबत मात्र सौम्य भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी 1992च्या दंगली प्रकरणी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेची कारवाई केली होती. त्यामुळे तत्कालीन शिवसेना पक्षाकडून तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली होती. त्यानंतर रमाबाई आंबेडकर नगर प्रकरणावरून छगन भुजबळ यांनी सामना दैनिकाचे संपादक बाळासाहेब ठाकरे, कार्यकारी संपादक संजय राऊत आणि प्रकाशक सुभाष देसाई यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला होता. मात्र कालांतराने भुजबळ यांनी हा खटला मागे तर घेतलाच, पण ठाकरे आणि त्यांच्यात दिलजमाई झाली. बाळासाहेबांनी त्यांना सहकुटुंब जेवायचे आमंत्रण दिले आणि तेही मातोश्रीवर सहकुटुंब गेले होते. त्यामुळे त्यावेळी छगन भुजबळ पुन्हा शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आले होते. मात्र, या भुजबळ यांनी ती शक्यता फेटाळली.

राज ठाकरे यांनीही शिवसेना सोडली, तेव्हा पक्षाला मोठा फटका बसला होता. अनेक शिवसैनिक राज ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडले होते. त्यानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. मात्र राज ठाकरेंनी जरी शिवसेना सोडली असली, तरी त्यांचे बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे असलेले कौटुंबिक नाते पूर्णपणे तोडलेले नाहीत. 16 जुलै 2012 साली आपल्या पक्षाच्या मेळाव्यासाठी अलिबागला निघालेल्या राज ठाकरेंना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी फोन केला होता आणि उद्धव यांच्या छातीत दुखत असून त्यांना ‘लिलावती’ रुग्णालयात घेऊन जायचे असे सांगितले. त्यावेळी राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे सारथी बनल्याचे पाहायला मिळाले होते.

त्याउलट नारायण राणे यांनी बाळासाहेबांबाबत आत्मियता आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कटुता जपली आहे. त्यांनी कायम उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. अनेकवेळा त्यांनी पातळी सोडत, उद्धव यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली आहे. मात्र असे असले तरी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आजच्या सामनाच्या अग्रलेखात शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल करताना, या तिघांबाबत आक्रमक भूमिका घेतलेली नाही. “तुम्हाला शिवसेनेचा पराभव करता येणार नाही. जनतेचे विराट सैन्य आमच्या पाठीशी आहे.’ पण त्यांची समोरासमोर लढण्याची हिंमत झालीच नाही. त्यांनी मिंधे गटाच्या बृहन्नडांना, शिखंडींना पुढे करून शिवसेनेच्या पाठीत बाण खुपसला. महाराष्ट्र त्यामुळे आकांत करीत आहे. याआधी छगन भुजबळ, नारायण राणे यांच्यासारखे नेते शिवसेनेतून बाहेर पडले. राज ठाकरे यांनीही त्यांचा मार्ग स्वीकारला. त्यांनी शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर आणि व्यक्तिशः आमच्यावर कठोर शब्दांत टीका केली, पण ज्या शिवसेनेचा जन्म प्रबोधनकार ठाकरे यांच्या आशीर्वादातून झाला, ज्या प्रबोधनकारांनी मराठी माणसांच्या संघटनेस ‘शिवसेना’ हे ज्वलंत नाव दिले व ज्या शिवसेनेसाठी आपले सुपुत्र बाळ केशव ठाकरे यांना महाराष्ट्र सेवेसाठी अर्पण केले, त्या शिवसेनेचे अस्तित्व मिटविण्याचे अधम व नीच कृत्य जसे एकनाथ शिंदे या गारद्याने केले, तसे या मंडळींनी केले नाही”, अशा टीका या अग्रलेखात करण्यात आली आहे. त्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे यापुढे लक्ष्य केवळ शिंदे गटच राहणार आहे, असे स्पष्ट होते.


हेही वाचा – …तर मुस्लीम पुरुष दुसरा निकाह करू शकत नाही, अलाहबाद उच्च न्यायालयाचा निर्णय