शिंदेसाहेब आपण निष्ठावान शिवसैनिकासारखे वागला नाहीत, आपले चुकलेच, बंड्या साळवींनी कान टोचले

Shindesaheb, you have not behaved like a loyal Shiv Sainik, said Bandya Salvi

कल्याणमधील जेष्ठ शिवसैनिक विजय उर्फ बंड्या साळवी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात शिवसेना भवन मध्ये पक्षाच्या संघटनात्मक विषयावर चर्चा सुरू होती. यावेळी विजय उर्फ बंड्या साळवी यांना बंडखोर एकनाथ शिंदे यांचा फोन आला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी फोन कोणाचा आहे हे ओळखले आणि तुमच्या बोलण्यात माझा अडसर नको. तुम्हाला बोलताना कोंडल्यासारखे वाटू नये म्हणून थोडा वेळ बाजूच्या खोलीत जातो, असे सांगून उद्धव ठाकरे बाजुच्या दालनात गेले.

बंड्या साळवी आणि शिंदे यांच्यात काय झाले बोलने – 

यानंतर बंड्या साळवी यांना एकनाथ शिंदे यांनी आपण घेतलेली भूमिका आणि त्या भूमिकेसंदर्भात विजय साळवी यांना विचारणा केली. त्यावेळी साळवींनी मातोश्रीमध्ये बसलो आहोत हे दाखवून न देता आपण शिवसेने सोबतच राहणार आहोत. लहानपणापासून ज्या संघटनेते वाढलो. ज्या संघटनेने मोठे केले ती संघटना सोडण्याचा विचार मनात येऊ शकत नाही, असे शिंदे यांना सांगितले. यावेळी शिंदे यांनी मीही शिवसेनेतच आहे, असे म्हटले. त्यावेळी साळवी यांनी उव्दिग्न होऊन शिंदे साहेब आपण निष्ठावान शिवसैनिकासारखे वागला नाहीत. आपले चुकलेच आहे. त्यामुळे तुमच्या बरोबर येऊ शकत नाही. असे शिंदे यांना सुनावले.

पुन्हा संघटनात्मक बांधणीवर झाली चर्चा –

फोनवरील संभाषण संपल्यानंतर बाजुच्या दालनात असलेले पक्षप्रमुख उध्दव ठाकरे पुन्हा साळवी बसलेल्या दालनात येऊन बसले. त्यावेळी शिंदे काय बोलले याविषयी चकार शब्द न विचारता ठाकरे यांनी पुन्हा संघटनात्मक बांधणी, यापुढील काळातील पक्षाची रणनीती विषयावर साळवी यांच्यासह तेथे जमलेल्या सेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

दगा दिल्याने व्यथित झालो आहे –

अडीच वर्षापूर्वी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना, ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव पुढे करून त्यांना मुख्यमंत्री पद देण्याची सूचना केली होती. एवढा विश्वास ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर टाकला होता. या सगळ्या घटनांचे आपण साक्षीदार आहोत. शिंदे यांनी बंडखोरी करून त्या विश्वासाला छेद दिला आहे. ठाणे जिल्ह्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे हेच सर्वेसर्वा हाच संदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवसैनिक, पदाधिकारी, नेत्यांना दिला होता. ठाणे जिल्ह्यातील सेनेतील नियुक्त्या, पालिका आयुक्त, पोलीस अधिकारी यांच्या बदल्यांमध्ये शिंदे यांना ठाकरे यांनी पूर्ण मोकळीक दिली होती. विकास कामांसाठी निधी वाटप. त्यात मातोश्रीचा कोणताही हस्तक्षेप ठेवला नव्हता. हे सर्वदूर माहिती असताना शिवसेनाप्रमुखांनंतर मोठ्या कष्टाने, ताकदीने पक्ष पुढे नेणारे उध्दव ठाकरे यांना एका विश्वासू चेल्यानेच बंडखोरी करून दगा दिल्याने आपण खूप व्यथित आहोत, असे स्पष्ट मत विजय साळवी यांनी व्यक्त केले.