पनवेल : “उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करणार, त्याचबरोबर महाविकास आघाडीची ताकद वाढविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे”, अशी प्रतिक्रिया पेण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष शिशिर प्रभाकर धारकर यांनी ठाकरे गटात गेल्यानंतर केली आहे. शिशिर प्रभाकर धारकर यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
पक्ष प्रवेश केल्यानंतर शिशिर धारकर यांनी दैनिक ‘आपलं महानगर’शी बोलताना म्हणाले, ” उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करणार, त्याचबरोबर महाविकास आघाडीची ताकद वाढविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. पेण विधानसभा मतदारसंघासह रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेरोजगारी, पाणी, प्रदूषण यासारखे अनेक ज्वलंत विषय आहेत. त्यावर काम करण्याचे आपण ठरविले असल्याचे ते म्हणाले. आपण स्वतः समाजाच्या तळागाळापर्यंत जाऊन काम करणारा कार्यकर्ता असल्याने सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यार भर असणार आहे. तसेच गावागावात शाखा स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पक्षाकडून जबाबदारी मिळाल्यानतंर झोकून काम करेन
आगामी विधानसभा निवडणुकी उमेदवारी मिळण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत, यासंदर्भात शिशिर धारकर “आपल्यावर अद्याप पक्षाने कोणतीही जबाबदारी दिलेली नसली. तरी भविष्यात जी जबाबदारी मिळेल त्यात स्वतःला झोकून देऊन काम करणार असल्याचे सांगतानाच हा प्रवेश आमदारकीची उमेदवारी मिळविण्यासाठी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेवटी काम पाहूनच पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेत असतात अशीही पुष्टी त्यांनी जोडली.”
हेही वाचा – ठाकरे गटात प्रवेश करणारे शिशिर धारकर यांच्याबद्दल ‘ही’ गोष्टी माहीत आहे का?
शिशिर धारकर यांचा अल्पपरिचय
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे माजी मंत्री प्रभाकर नारायण धारकर यांचे शिशिर धारकर हे ज्येष्ठ चिरंजीव असून, वडील राज्याच्या राजकारणात आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असताना शिशिर धारकर यांच्याकडे पेणमधील राजकारणाची सूत्रे हाती घेतली आहे. शिशिर यांनी अल्पावधीतच पेणच्या राजकारणावर पकड बसवली आणि त्यातूनच त्यांनी 1990 ते 1995 च्या कालावधीत नगराध्यक्षपदापर्यंत झेप घेतली. त्यानंतर रायगड जिल्ह्यात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या पेण अर्बन बँकेच्या अध्यक्षपदाची सुत्रेही प्रभाकर धारकर होते. यानंतर शिशिर धारकर यांनी बँकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. बँकेचा कारभार जोमात असतानाच बँकेला 13 वर्षांपूर्वी 758 कोटींच्या घोटाळ्याचे ग्रहण लागल्यानंतर शिशिर धारकर यांच्या वाट्याला वनवास आला. त्यानंतर त्यांची सीबीआयकडूनही चौकशीही झाली. अलीकडे शिशिर धारकर पुन्हा एकदा सामाजिक कार्यात सक्रीय झाले.