shiv jayanti 2022 : मराठा आरक्षणासंदर्भातील प्रश्नावर अजित पवारांचा संताप, म्हणाले ‘आम्हाला आमच्या जातीचा अभिमान नाही का?’

MINISTER ajit pawar said will make bill on obc reservation for upcoming elections with reservations

राज्यात आज मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या शिवनेरी गडावर राज्य सरकारच्या वतीने छत्रपती शिवरायांचा जन्मसोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी राज्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), मंत्री आदित्य ठाकरे, आदिती तटकरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

या जन्मसोहळ्यानंतर अजित पवार यांच्या भाषणादरम्यान एका तरुणाने उपस्थित केलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अजित पवार चांगलेच संतापले आहे.  मी, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील आम्ही काही मराठ्यांच्या पोटचे नाहीत का? आम्हाला आमच्या जातीचा अभिमान नाही का? असं म्हणत त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील तरुणाच्या प्रश्नावरून  चांगलेच सुनावले आहे.

तु कुणाची सुपारी घेऊन आलास का?- अजित पवार

मंत्री अजित पवार यांचे भाषण सुरु असताना एका तरुणाने अचानक उठून मराठा आरक्षणासाठी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली. यावर अजित पवारांनी त्या तरुणाचे सर्व बोलणे ऐकून घेत खाली बसण्यास सांगितले. काही वेळाने पुन्हा त्या तरुणाने अजित पवार यांच्या भाषणात अडथळा आणला. यानंतर मात्र अजित पवार चांगलेच चिडले. “तु कुणाची सुपारी घेऊन आलास का?” अशा शब्दात अजित पवार यांनी खडसावले. “शिवजयंती आहे. असे चालणार नाही. मी, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील आम्ही काही मराठ्यांच्या पोटचे नाहीत का? आम्हाला आमच्या जातीचा अभिमान नाही का? पण शिवाजी महाराजांनी काय शिकवलंय? सर्वांना सोबत घेऊन जायलाच शिकवलंय ना ? इतर कुठल्या समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे” ही आमची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्टीकरण केली आहे.

“मराठा सामाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हीच आमची भुमिका आहे. मात्र, प्रश्न न्यायालयात अडकला आहे. नियमात बदल करून आरक्षण द्यायचे असेल तर केंद्र सरकारकडून नियमातच बदल करावा लागेल” असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

याचमुद्द्यावर नंतर पुन्हा पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, “पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देऊ नये असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. त्या कायद्यात बदलाची गरज आहे. याबाबत तरुण सहकाऱ्यांनी मागणी केली. असं किती दिवस चालणार विचारलं गेलं. मात्र, आधीच्या आरक्षणाला धक्का न लागता कसं करता येईल यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासंदर्भात पंतप्रधानांना भेटून त्यांना सांगण्याचं काम उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालं आहे”, असंही ते म्हणाले.


shiv jayanti 2022 : पंतप्रधान मोदींकडून शिवरायांना मानवंदना; शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा