नाशिकमध्ये दादा भुसे, सुहास कांदेंना पर्याय शोधा; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश

शिवसेना आता कामाला लागली असून शिवसेना भवनात पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत. यानुसार ते महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि पुढील रणनिती ठरवत आहे

shiv sena aggressive find alternatives to dada bhuse suhas kande uddhav thackerays order to shiv sainiks

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून पायउतार व्हावे लागले. यामुळे आता शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे असा संघर्ष पाहायला मिळत आहे. यात शिंदे सरकारला शह देण्यासाठी आता शिवसैनिकांसह उद्धव ठाकरे स्वत: मैदानात उतरले आहेत. शिवसेनेने आता एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक भूमिका घेत बैठकांचा सपाटा सुरु केला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे स्वत: दादरच्या शिवसेना भवनात बैठकात घेत आहेत. या बैठकांच्या माध्यमातून पक्ष बांधणीसाठी प्रयत्न सुरु आहेत. आता नाशिक जिल्ह्यात दादा भुसे आणि सुहास कांदे यांना पर्याय शोधा, असे आदेश माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले आहेत.

राज्यात सत्ता पालट होत भाजपच्या पाठिंब्यावर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, या एकीकडे नव्या सरकारकडून आता निर्णय आणि घोषणांचा सपाटा सुरु आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंकडून शिवसेना भवनात बैठकांचा धडाका सुरु आहे. मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेनेला नव्याने उभारी देण्यासाठी कामाला लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते शिवसेना नगरसेवक, जिल्हा प्रमुख यांच्यापासून पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत चर्चा करत आहेत. तसेच बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जात जाहीर मेळावे घेत आहेत.

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते पुढे काय पाऊल उचलणार यावर बरीच चर्चा सुरु झाली. मात्र राजीनामाच्या दिवशीच त्यांनी आपण पुढे काय करणार याचे संकेत दिले होते. याप्रमाणे आता शिवसेना कामाला लागली असून शिवसेना भवनात पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत. यानुसार ते महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि पुढील रणनिती ठरवत आहे.

शिवसेनाच्या आमदारांच्या बंडखोरीमुळे ठाकरेंची शिवसेना आक्रमकरित्या रस्त्यावर उतरली आहे. यात शिवसेनेत्या 40 बंडखोर आमदार आणि मंत्र्यांच्या जागी पर्यायी आणि सशक्त उमेदवार शोधा आणि मतदारसंघात जास्तीत जास्त वेळ द्या असे आदेश शिवसैनिकांना दिले आहेत. तसेच पक्ष बांधणीवरही उद्धव ठाकरे यांनी जोर दिला असून बैठकांचा सिलसिला सुरु केला आहे. या पार्श्वभूमीवर आज दुपारी राज्यातील महिला आघाडीतल्या प्रमुख महिला नेत्यांची शिवसेना भवनात बैठक बोलावली होती. या बैठकीत शिवसेनेत आता महिला उमेदवारांना प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन दिले आहे.