वाचाळवीर मंत्र्यांची हकालपट्टी करा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महिला शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी

राज्यात मंत्रिपदावर असलेले अब्दुल सत्तार, रवींद्र चव्हाण, गुलाबराव पाटील यांनी केलेले आक्षेपार्ह वर्तन, उच्चारलेले शब्द आणि बेताल वक्तव्यामुळे राज्यातील समस्त महिलांचा अपमान झाला आहे. त्यांनी मंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. त्यामुळे या वाचाळवीर मंत्र्यांची मंत्रिपदावरून तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शिष्टमंडळाने बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून केली.

शिवसेना पक्षाच्या आमदार आणि प्रवक्त्या मनीषा कायंदे यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज, डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणा-या पुरोगामी महाराष्ट्रातील राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर या महाराष्ट्रांच्या लेकींचा नेहमीच देशभर सन्मान केला जातो. पण या आदर्श लेकींच्या संस्कारांना काळीमा फासण्याचे काम सरकारचे हे प्रतिनिधी करीत आहेत.

सत्ताधारी मंत्री आणि आमदारांकडून महिलांविषयी बेताल तसेच मानहानीकारक वक्तव्य करून राज्यातील महिलांचा अपमान होत आहे. या नियमबाह्य सरकारने मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला लोकप्रतिधीला स्थान न देऊन सत्ताधारी पक्षातील महिला लोकप्रतिनिधींचा हक्क हिरावून घेत राज्यातील समस्त महिलांविषयीचा आपला आकसभाव दाखवलेला आहे, असा आरोप निवेदनात केला आहे.

विविध मार्गाने महिलांना अपमानित करणा-या मंत्रिमंडळातील सहका-यांविषयी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोणतीही भूमिका घेताना दिसत नाहीत. या मंत्र्यांच्या विरोधात राज्यातील महिलांच्या भावना तीव्र असून राज्यपालांनी यामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी झाली आहे. त्यामुळे मंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावलेल्या रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी किंवा त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली आहे.

या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण, महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा निर्मला सामंत प्रभावळकर, माजी महापौर स्नेहल आंबेरकर, ज्योती ठाकरे, वैशाली नागवडे आदींचा समावेश होता. दरम्यान, राष्ट्रवादीच्या महिला शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन दिले.


हेही वाचा : संजय राऊतांच्या जामिनानंतर शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जल्लोष; पेढे वाटत साजरा केला आनंदोत्सव