हिंगोली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून हिंगोली मतदारसंघात बाबूराव कदम कोहळीकर उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच, जाहीर उमेदवार हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. शिवसेनेकडून जाहीर केलेल्या हेमंत पाटील यांनी भाजपकडून विरोध होत होता. त्यामुळेच उमेदवार बदलल्याची माहिती समोर येत आहे. (Shiv Sena Baburao Kadam Kohlikar candidature from Shiv Sena in Hingoli Constituency Hemant Patil candidature cancelled)
महायुतीमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीत हिगोली मतदारसंघाचा समावेश असून हेमंत पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली होती. मात्र आज तडकाफडकी उमेदवारी रद्द करत बाबूराव कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे लोकसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे. याआधी कधीच जाहीर केलेला उमेदवार बदलण्यात आला नव्हता.
हेही वाचा – Lok Sabha 2024 : कल्याणमध्ये ठाकरे गटाची खेळी; श्रीकांत शिंदेंविरोधात लढणाऱ्या वैशाली दरेकर कोण?
हिंगोली मतदारसंघातून जाहीर झालेल्या हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजपकडून प्रचंड विरोध केला जात होता. त्या विरोधानंतर म्हणजेच भाजपच्या दबावानंतर अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज हेमंत पाटील यांची जाहीर केलेली उमेदवारी रद्द करत बाबूराव कदम कोहळीकर उमेदवारी जाहीर केली आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपचे पदाधिकारी आणि आमदार तानाजी मुटकुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत हेमंत पाटलांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त केली होती. तसेच, हिंगोली मतदारसंघ आपल्याकडे घेण्याची मागणी केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आमदार तानाजी मुटकुळे आणि पदाधिकारी यांची समजूत काढत हा मतदारसंघ आपल्याकडे येऊ शकत नाही असे सांगितले. मात्र आपण उमेदवार बदलण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करू शकतो असे सांगितले. त्यानंतर आज हिंगोली मतदारसंघातून हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करत बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
हेही वाचा – MVA : तर स्वतंत्र भारताचे गुलाम नागरीक म्हणून जगावे लागेल – विजय वडेट्टीवार