Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र शिवसेना-धनुष्यबाणाची लढाई; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच ठरणार भाई?

शिवसेना-धनुष्यबाणाची लढाई; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच ठरणार भाई?

Subscribe

राज्यात ७ महिन्यांपूर्वी झालेल्या सत्तांतरापासून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या लढाईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच गट विजयाची मिठाई चाखणार असल्याच्या चर्चेने सध्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात जोर धरला आहे.

राज्यात ७ महिन्यांपूर्वी झालेल्या सत्तांतरापासून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या लढाईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच गट विजयाची मिठाई चाखणार असल्याच्या चर्चेने सध्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. (Shiv Sena bow and arrow symbol battle C M Eknath Shinde and Uddhav Thackeray)

शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाणाचे चिन्ह कुणाला मिळणार याबाबतचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच घेण्याची शक्यता आहे. सोमवारी ३० जानेवारी रोजी केंद्रीय निवडणूक आयोगात याबाबत अंतिम सुनावणी होणार असून याच दिवशी अथवा याच आठवड्यात याबाबतचा निर्णय जाहीर होणार असल्याचे खात्रीलायकरित्या समजते. याआधी २० जानेवारी रोजी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांना २३ जानेवारीपर्यंत लेखी उत्तर देण्याचे आदेश दिले होते. तसेच याबाबतची पुढील सुनावणी ३० जानेवारी रोजी घेण्याचे निश्चित केले होते. विशेष म्हणजे २३ जानेवारी याच दिवसापासून शिवसेना पक्षप्रमुखपदाचा उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. याच दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती होती.

- Advertisement -

यानिमित्ताने विधान भवनात त्यांच्या तैलचित्राच्या अनावरणाचा कार्यक्रम आयोजित करीत शिंदे गटाने ठाकरे गटावर सरशी साधण्याचा प्रयत्न केला होता. बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरणाचा सोहळा असतानाही उद्धव ठाकरे हे या ठिकाणी अनुपस्थित होते, हे दाखवण्याचा प्रयत्न करीत बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आपणच असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून वारंवार करण्यात येत आहे. त्यामुळे एकंदरीतच सध्याचे वातावरण, अनेक नेत्यांची देहबोली आणि अतिआत्मविश्वास पाहता लोकप्रतिनिधी असलेले आमदार, खासदार, नेते आणि कार्यकर्ते यांच्या जोरावर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह आपल्यालाच मिळेल, असा दावा शिंदे गटातील काही नेत्यांकडून करण्यात येत आहे.

दुसरीकडे ठाकरे गटातील नेत्यांमध्ये मात्र शिंदे गटातील नेत्यांप्रमाणे असा उत्साह पाहायला मिळत नाही. याउलट अनेक जण निवडणूक आयोगाचा निकाल आपल्याविरोधात गेल्यास यासाठी आपला ‘प्लॅन बी’ काय असेल, यावर भर देत असल्याचे चित्र आहे. धनुष्यबाण चिन्ह आपल्याला न मिळाल्यास केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई कशी देता येईल यासाठी तयारी केली जात असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात नुकत्याच एका कार्यक्रमात आपल्यासारख्या ज्वलंत निखार्‍यांनीच मशाल पेटणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांच्या या विधानाकडे गांभीर्याने पाहिले जात असून निवडणूक आयोगाचा निकाल जर विरोधात गेल्यास ठाकरे गटाकडून इतर पर्यायांचीही चाचपणी करण्यात येत आहे.

- Advertisement -

सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयातही सुनावणी सुरू असून पुढील सुनावणी १४ फेब्रुवारी रोजी आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय देण्याचे अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले होते. केंद्रीय निवडणूक आयोगच याबाबत निर्णय देणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान स्पष्ट होताच शिंदे गटातील नेत्यांनी तेव्हापासूनच आनंद व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. केंद्रीय निवडणूक आयोगात होणार्‍या सुनावणीदरम्यान विजय आपलाच होईल, असा विश्वास तेव्हापासून शिंदे गटाकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता सुनावण्यांची प्रक्रिया आणि कागदपत्रे दोन्ही बाजूंनी देण्याचा शेवटचा दिवस सोमवार आहे. सोमवारी किंवा याच आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिला तर विजय आपलाच होणार, या विश्वासात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील अनेक नेते आहेत.

गद्दार निशाणी शिंदे कशी पुसणार?

दरम्यान, सध्या घाणेरडे राजकारण सुरू असून बाप आणि घर पळवणारी टोळी राज्यात आहे. त्यामुळे शिवसेनेतून गद्दार गेल्यानंतर हिरे आणि निखारे आपल्या सोबत असल्याचा पुनरुच्चार माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सेनाभवनात बोलताना केला होता. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निशाणी जरी कोणी पळवली तरी खरे शिवसैनिक आणि इज्जत कुठून आणणार, मिंधे गट यांच्या कपाळावरील गद्दार हा शिक्का पुसता येणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी दिली.


हेही वाचा – निवडणूक आयोगापुढे चिन्ह गोठवण्याचाही पर्याय; आतापर्यंत ‘या’ पक्षांचे चिन्ह गोठवले

रामचंद्र नाईक
रामचंद्र नाईकhttps://www.mymahanagar.com/author/ramchandra/
गेल्या ८ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक आणि क्रीडा विषयांवर लिखाण. नियमितपणे वृत्तपत्र वाचनाची आवड.
- Advertisment -