घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीराजेंची कोंडी

छत्रपती संभाजीराजेंची कोंडी

Subscribe

संभाजीराजे हे 2009 साली कोल्हापूरमधून लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते, मात्र त्यांचा त्यावेळी पराभव झाला होता. 2014 साली लोकसभा निवडणुकीत आपल्याला 2009च्या निवडणुकीत दगाफटका झाल्याची सल संभाजीराजेंच्या मनात असल्याने त्यांनी 2014च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा प्रचार केला नाही.

राज्यसभा निवडणुकीतील संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून सर्वच राजकीय पक्षांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे माजी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेवर फसवणुकीचा आरोप केलाय. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 पैकी दोन जागांवर निवडणूक लढवणार्‍या शिवसेनेने मंगळवारी आपले उमेदवार जाहीर केले. एका जागेवर शिवसेनेने कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना राज्यसभेचे उमेदवार म्हणून, तर दुसर्‍या जागेवर विद्यमान खासदार संजय राऊत यांना पुन्हा रिंगणात उतरवले आहे. शिवसेनेच्या या निर्णयानंतर संभाजीराजे शिवसेनेवर नाराज झाले आहेत. दुसरीकडे 2009 साली राष्ट्रवादीकडून लोकसभा लढवणार्‍या संभाजीराजेंना शिवसेना अस्पृश्य का, असा सवालही शिवसेनेने उपस्थित केला आहे.

शिवसेनेने माझा विश्वासघात केला आहे. यादरम्यान पत्रकारांनी तुम्ही असे का बोलत आहात, असे विचारले असता ते म्हणाले की, यापूर्वी मला शिवसेनेने पुरस्कृत उमेदवार होणार असल्याचे सांगितले होते. मागील आठवड्यात मुख्यमंत्र्यांशी विस्तृत चर्चा झाली. आमच्यात जे ठरले ते मुख्यमंत्री करतील याची मला खात्री आहे. मला खात्री आहे की उद्धव ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचा आदर राखतील, असे संभाजीराजे सांगत असले तरी एकेकाळी संभाजीराजेंनी राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढवली होती.

- Advertisement -

संभाजीराजेंनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढवली लोकसभा निवडणूक
संभाजीराजे यांनी 2009ची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढवली, पण अपक्ष उमेदवार सदाशिवराव मंडलिक यांनी त्यांचा 44,000 मतांनी पराभव केला. 2014मध्ये युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर संभाजीराजेंना राज्यसभेत राष्ट्रपतीनियुक्त सभासद म्हणून खासदारकीही मिळाली. 11 जून 2016 रोजी संभाजीराजे यांची सामाजिक कार्यकर्ते या श्रेणीसाठी राष्ट्रपतीनियुक्त खासदार म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांचे बंधू मालोजीराजे छत्रपती यांनी काँग्रेसकडून 2004 मध्ये कोल्हापुरातून विधानसभा निवडणूक लढवली होती आणि ते जिंकलेही होते.

शिवसेनेची उमेदवारी घेण्यास नकार का?
मग आताच संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करून त्यांची उमेदवारी घेण्यास नकार का दिलाय? संभाजीराजे हे 2009 साली कोल्हापूरमधून लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते, मात्र त्यांचा त्यावेळी पराभव झाला होता. 2014 साली लोकसभा निवडणुकीत आपल्याला 2009च्या निवडणुकीत दगाफटका झाल्याची सल संभाजीराजेंच्या मनात असल्याने त्यांनी 2014च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा प्रचार केला नाही, मात्र दोन वर्षांनंतर द्विवार्षिक राज्यसभेच्या राष्ट्रपतींच्या कोट्यातून छत्रपती संभाजीराजे हे राज्यसभेवर निवडून गेले, मात्र यापूर्वी संभाजीराजेंचे थोरले बंधू मालोजीराजे यांनी काँग्रेसमधून, तर संभाजीराजे यांनी 2009मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवली होती. मग आताच शिवसेनेचे उमेदवार बनून सन्मानाने राज्यसभेत खासदार बनायला काहीही हरकत नसावी, असे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. शिवसेनेने राजेंना सन्मानाने वागवलं तर असतंच शिवाय त्यांच्या शब्दाला वजन राहिले असते, पण अपक्ष उमेदवार म्हणून तुम्ही उभे राहा असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या काही चाणक्यांचे मत असल्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावेळी आपल्या दोन उमेदवारांना निवडून आणल्यावर राजेंसाठी भाजपकडे राज्यसभेसाठी आवश्यक असलेल्या मतांची योग्य संख्या (42) शिल्लक उरणार नाही, असा दावा शिवसेनेच्या एका खासदाराने केला.

- Advertisement -

सेनेच्या मतांवर अपक्ष म्हणून निवडून येऊन भाजपला साथ?
विशेष म्हणजे संभाजीराजे हे देवेंद्र फडणवीस यांना काही दिवसांपूर्वी भेटले होते. तसेच त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा करण्याच्या अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पक्षाचा पाठिंबा त्यांना जाहीर केला, मात्र त्यानंतर दोनच दिवसांत कोलांटउडी मारत पवार यांनी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारालाच राष्ट्रवादी मत देईल, असे सांगत छत्रपतींना अडचणीत आणले. याच दरम्यान छत्रपतींनी पुण्यात स्वतंत्र पक्ष काढायची घोषणा केली होती आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवायचीदेखील घोषणा केली. तसेच शिवसेनेकडे सक्षम उमेदवार असताना बाहेरच्या खरंतर भाजपच्या अतिशय जवळ असलेल्या उमेदवाराला सेनेने मते का द्यावीत, अशीच चर्चा शिवसेनेत आहे. तरीही उद्धव ठाकरेंनी आपला एक सक्षम उमेदवार मागे घेऊन त्या जागी संभाजीराजे यांना सेनेचा उमेदवार बनवून निवडून आणायची तयारी दाखवली होती, परंतु संभाजीराजे देवेंद्र फडणवीस यांच्या नीतीनुसार वागताहेत, अशीही आता दबक्या आवाजात चर्चा शिवसेनेत सुरू आहे. खरंतर सेनेच्या मतांवर अपक्ष म्हणून निवडून येऊन ते भाजपला साथ देणार असतील, तर त्यांना भाजपनेच उमेदवारी द्यावी, असा मतप्रवाह शिवसेनेत आहे.

दरम्यान, माझ्या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षावरील बैठकीत आपण शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून उभे राहा, असे आपल्याला आश्वासन दिल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते, मात्र शिवसेना पुरस्कृत नव्हे, तर शिवसेनेत प्रवेश करून मनगटावर शिवबंधन बांधूनच तुम्हाला राज्यसभेत जावे लागेल, असा मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दोनच दिवसांपूर्वी त्यांची भेट घेतली होती. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश झाल्याशिवाय राजेंना राज्यसभेत पाठवू नये, असा अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुखांनी घेतला आहे.

…तर भाजपने त्यांची एक जागा संभाजीराजेंना द्यावी
देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे आणि भाजपला संभाजीराजेंच्या खासदारकीबाबत एवढीच चिंता असेल, तर त्यांनी त्यांची एक जागा संभाजीराजेंना द्यावी किंवा त्यांच्या एका खासदाराला राजीनामा द्यायला लावून तिथून संभाजीराजेंना निवडून आणावे, मात्र देवेंद्र फडणवीस आणि भाजप असे काहीही करणार नाही. त्यामुळे संभाजीराजे अपक्ष म्हणून निवडून येतात का हे येत्या काही दिवसांत समजणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -