किती जणांना तुरुंगात टाकाल? तुरुंग कमी पडतील…, शिवसेनेने भाजपाला सुनावले

shivsena

संजय राऊत यांना ईडीने पत्राचाळ प्रकरणी अटक केल्यानंतर आज सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि शिंदे यांच्यावर टीक करण्यात आली आहे. या अग्रलेखाला भांगेच्या नशेतले स्वप्न!, असे शिर्षक देण्यात आले आहे. यात महाराष्ट्र काय किंवा शिवसेना काय कधीही झुकणार नाही. किती जणांना तुरुंगात टाकाल? तुरुंग कमी पडतील अशी वेळ तुमच्यावर आल्याशिवाय राहणार नाही. सत्तेचा अमरपट्टा बांधून कोणीच जन्मास आलेले नाही, अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.

तुरुंग कमी पडतील –

‘महाराष्ट्रावर एकापाठोपाठ घाव घालण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. महाराष्ट्र तोडायचा तर आधी शिवसेनेस संपवायलाच हवे. शिवसेना संपवायची तर फोडाफोडी, दहशत निर्माण करायची व त्याआधी संजय राऊत यांच्यासारखे लढाऊ व प्रखर बोलणारे, लिहिणारे, राज्यभर फिरणारे नेते खोट्या प्रकरणात गुंतवून तुरुंगात टाकायचे, हे असले उद्योग सुरू आहेत. अर्थात महाराष्ट्र काय पिंवा शिवसेना काय कधीही झुकणार नाही. किती जणांना तुरुंगात टाकाल? तुरुंग कमी पडतील अशी वेळ तुमच्यावर आल्याशिवाय राहणार नाही, असे शिवसेनेने भाजपला सुनावले आहे.

आता हे सर्व लोक पुण्यात्मे झाले –

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करत भाजपसोबत युती केली आहे. या बंडखोरांवर शिवसेनेनं आक्रमक शब्दांत टीकास्त्र सोडलं आहे. ‘शिवसेनेतून शिंदे नामक गटात जे आमदार, खासदार सामील झाले व जे स्वतःची पोकळ छाती लपवून हिमतीचे बोल बोलत आहेत त्यातील अनेकांवर ‘ईडी’, आयकर खाते यांच्या कारवायांचा फक्त बडगाच उगारला गेला नव्हता तर त्यांच्या अटकेपर्यंत प्रकरण पोहोचले होते. आता हे सर्व लोक पुण्यात्मे झाले व ‘कर नाही त्याला डर कशाला’ अशा चिपळ्या वाजवत आहेत. मात्र या पळपुट्या नामर्द लोकांमुळे शिवरायांचा महाराष्ट्र बदनाम होत आहे, अशी टीका शिवसेनेने शिंदे गटावर केली आहे.

विरोधकांची एकजूट करण्याची हालचाल कराल तर याद राखा –

राजकीय विरोधक, मग त्या सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार असतील नाहीतर संजय राऊत, आमच्या विरुद्ध परखड बोलाल किंवा विरोधकांची एकजूट करण्याची हालचाल कराल तर याद राखा, असेच एकप्रकारे स्पष्टपणे बजावण्याचा हा प्रकार आहे. शिवसेनेचे अनिल परब यांच्या नसलेल्या व अद्यापही सुरू न झालेल्या रिसॉर्टमधून समुद्रात पाणी सोडले या भयंकर गुन्ह्याखाली परबांची कठोर चौकशी होते. 10-11 वर्षांपूर्वीच्या 50-55 लाखांच्या व्यवहाराचे प्रकरण बनावट पद्धतीने उभे करून संजय राऊत यांना तुरुंगात पाठवले जाते. 2004 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातील वडिलोपार्जित घराबाबत श्री. शरद पवार यांना आयकर विभाग आता नोटिसा पाठवतो. त्याच वेळेला नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या, ललित मोदी यांच्यासारखे असंख्य आर्थिक गुन्हेगार परदेशात पळून जातात. मुळात ज्यांच्यावर ‘ईडी’ने कठोर कारवाई करावी असे असंख्य महात्मे आज सत्ताधारी पक्षात विराजमान आहेत, अशा टोला अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.