मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाळी केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. आमदार, खासदार आणि काही नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील सहापैकी ५ आमदार याआधीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ‘जय महाराष्ट्र’ करत शिंदे गटात सामील झाले आहेत. मात्र, आता धक्कादायक म्हणजे कालपर्यंत ठाकरेंसोबत सक्रिय असलेले शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्रकुमार त्रिवेदी शिंदे गटात सामील झाले आहेत.
जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे वर्चस्व असल्याचे दाखवण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आदित्य ठाकरेंना शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. परंतु आमदार गेले तरी शिवसैनिक आणि पदाधिकारी शिवसेनेसोबतच आहेत, अशी वक्तव्ये शिवसेना नेत्यांकडून केली जात असतानाच आता पुन्हा एकदा शिवसेनेला औरंगाबादमध्ये धक्का बसला आहे.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात त्रिवेदी यांची चांगली पकड आहे. त्यांनी जिल्ह्यात पक्ष बांधणीत मोठे काम केले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेत शिंदे गटातील आमदारांचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. जिल्ह्यातील १६ पैकी तब्बल १२ ग्रामपंचायतींवर शिंदे गटातील आमदारांचे पॅनल विजयी झाले आहेत. यामुळे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांना चांगलाच धक्का बसला आहे.