घरताज्या घडामोडीदसरा मेळावा साजरा करताना सरकारचे निर्बंध कुठे लपून बसतात?, मनसेचा शिवसेनेवर निशाणा

दसरा मेळावा साजरा करताना सरकारचे निर्बंध कुठे लपून बसतात?, मनसेचा शिवसेनेवर निशाणा

Subscribe

मेळाव्याची परंपरा खंडीत झालेली चालत नाही

शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी दादरमधील शिवतीर्थावर होतो परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा षण्मुखानंद हॉलमध्ये हा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राज्यातील नाट्यगृहे २२ ऑक्टोबर पासून सुरु होणार असून शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी षण्मुखानंद नाट्यगृहाचे दरवाजे १ आठवड्यापुर्वीच खुले करण्यात आले आहेत. शिवसेनेच्या दसरा मेळावा षण्मुखानंद हॉलमध्ये घेण्यात येत असल्यामुळे मनसे उपाध्यक्ष अमेय खोपकर यांनी शिवसेनेवर घणाघात केला आहे. दसरा मेळावा साजरा करताना सरकारचे निर्बंध कुठे लपून बसतात असा सवाल अमेय खोपकर यांनी केला आहे. राज्यातील नाट्यगृह नाट्य निर्माते आणि प्रेक्षकांसाठी दसऱ्याला का खुली करण्यात आली नाही असाही सवाल अमेय खोपकर यांनी केला आहे.

मनसेचे उपाध्यक्ष अमेय खोपकर यांनी शिवसेनेवर घणाघाती हल्ला केला आहे. राज्यातील नाट्यगृह २२ ऑक्टोबरला सुरु होणार आहेत. परंतु शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी १ आठवड्यापुर्वीच षण्मुखानंद नाट्यगृह कसे सुरु करण्यात आले. या कार्यक्रमाला कोणी परवानगी दिली. याबाबत कोणी निर्णय दिला? असा सवाल खोपकर यांनी केला आहे. तसेच राज्यातील जनतेला नियम लागू असताना निर्बंध लागू असताना षण्मुखानंद सभागृहात दसरा मेळावा साजरा करताना सरकारचे निर्बंध कुठे लपून बसतात? असा घणाघात अमेय खोपकर यांनी केला आहे.

- Advertisement -

शिवसेनेला नियम वेगळे आणि नाट्यकर्मींना वेगळे, शिवसेनेचा मेळावा हा दसऱ्याला होणार आणि कोण जाते बघायला त्यांचेच पोलीस बघणार का ५० टक्क्यांच्या आसन क्षमतेमध्ये दसरा मेळावा होत आहे की नाही?. शिवसेनेच्या अंतर्गत बैठकीत हा निर्णय झाला का? कलाकारांना, नाट्यनिर्मात्यांना विचारा आणि निर्णय घ्या असे अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे. राज्यातील नाट्यगृहांमध्ये राजकीय नेत्यांचे मेळावे झाले कार्यक्रम झाले त्यावर काय कारवाई केली? त्यांना परवानगी का देण्यात आली आम्ही प्रश्न विचारायचे नाही का? प्रश्न विचारले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असे वक्तव्य अमेय खोपकर यांनी केलं आहे.

- Advertisement -

मेळाव्याची परंपरा खंडीत झालेली चालत नाही

इतकंच होतं तर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नाट्यगृहं का खुली केली नाहीत? नाट्यकर्मी आणि प्रेक्षक यांचा मेळावा राजकीय अजेंड्यापेक्षा मोठा आहे हे यांना लक्षातच येत नाही का? शिवसैनिक ५० टक्के आसनक्षमतेने गर्दी करतील, यावर आम्ही विश्वास ठेवायचा? दसरा मेळाव्याची परंपरा खंडित झालेली यांना चालत नाही, नाटकाची परंपरा इतके दिवस खंडित झाल्याचं यांना सोयरसुतकही नाही? असं अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा षण्मुखानंदमध्ये

दरवर्षी शिवेसनेचा दसरा मेळावा हा दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर होतो. गेल्या वर्षी कोरोनामुळे दसरा मेळाव्यात ऑनलाईन पद्धतीने शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना वर्च्युअल मार्गदर्शन केले होते. यंदा कोरोनाचा प्रभाव हळूहळू कमी होत असल्याने ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन पद्धतीने शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी जागा ठरली आहे. दरवर्षी दसरा मेळाव्याचा कार्यक्रम खुल्या मैदानात आयोजित करण्यात येतो परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम यंदा १५ ऑक्टोबर रोजी माटूंग्याच्या षण्मुखानंद नाट्यगृहात होणार आहे.


हेही वाचा : षण्मुखानंदमधील दसरा मेळावा पक्षप्रमुखांना अडचणीचा?


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -