सातारा – प्रकृती बरी नसल्यामुळे हवापालटासाठी गावी गेलेल्या एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील गैरहजेरीवरुन उलटसुलट चर्चा सुरु झाली. शिंदे नाराज असल्याचे बोलेले जाऊ लागले. या चर्चांदरम्यान एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “सत्ता स्थापन होत असताना, मी गावाला जायचं नाही का? असा काही नियम आहे का? मी नेहमी गावी येतो. मी एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलो आहे, त्यामुळे मला इथे आल्यानंतर आपली माणसं भेटतात, त्यामुळे एक वेगळा आनंद होतो.”
दरम्यान श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरू आहे, यावर देखील शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. श्रीकांत शिंदे यांच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत आपण पत्रकारच चर्चा करत आहात. या सर्व चर्चा आहेत. एक बैठक अमित शहा यांच्यासोबत झाली आहे, दुसरी बैठक आमची तिघांची (शिंदे-फडणवीस-अजित पवार) होईल. त्यामधून महाराष्ट्राच्या हिताचा होईल असा निर्णय घेतला जाईल, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळ म्हटलं.
एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की मी माझी भूमिका गेल्या आठवड्यातच स्पष्ट केली आहे. भाजपचे केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय घेईल तो शिवसेनेला मान्य असेल. त्याला माझा आणि शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा राहील. महत्त्वाची खाती शिवसेनेने मागितली आहेत का, यावर शिंदे म्हणाले की, चर्चा सुरु आहेत, चर्तेतून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. आम्हाला लोकांनी निवडून दिले आहे. लोकांना जी आश्वासने दिली आहेत, ती पूर्ण करायची आहे. आम्ही विकासासाठी लोकांना बांधिल आहोत आणि बांधिलकीतून कामे करायची आहेत. मला काय मिळेल, कोणाला काय मिळेल यापेक्षा जनतेला काय मिळणार हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.
श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार का?
श्रीकांत शिंदे यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर त्यांनी अधिक बोलणं टाळलं. एकनाथ शिंदे आज रात्री त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी येणार आहेत. त्यानंतर ते प्रकृती बरी असेल तर महायुतीच्या नेत्यांना भेटतील. किंवा सोमवारी त्यांची बैठक होईल, अशी माहिती शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली आहे.
हेही वाचा : Mahayuti : सरकार स्थापनेआधीच धुसफूस; अजित पवार सोबत नसते तर, शिवसेना 90-100 आमदारांवर असती
Edited by – Unmesh Khandale