मुंबई – महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर सरकार स्थापन करण्यास वेळ होत आहे. दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय नेत्यांसोबत बैठक झाल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईत परतले आणि तातडीने सातारा जिल्ह्यातील दरे गावी रवाना झाले आहेत. आज दुपारी महायुतीच्या तिन्ही नेत्यांची मुंबईत होऊ घातलेली बैठक यामुळे रद्द करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची भाजपची तयारी नाही. त्यांनी मागितलेली खाती देण्यासही भाजपकडून विरोध होत असल्यामुळे शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र असे काहीही झालेले नाही, नाराजीचे काहीही कारण नाही. एकनाथ शिंदे यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते आराम करण्यासाठी त्यांच्या मुळ गावी गेल्याचे शिवसेना (एकनाथ शिंदे) नेते आणि माजी मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.
लवकरच सरकार स्थापन होईल – उदय सामंत
महायुतीकडून सरकार स्थापनेचा मुहूर्त अजून ठरत नाही. दिल्लीमध्ये महायुतीच्या तिन्ही नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय जाहीर केला जाईल आणि शपथविधीची तारीख जाहीर होईल अशी अपेक्षा होती. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीहून मुंबईत परतले आहेत. मुंबईतून ते थेट त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे गावी रवाना झाले. यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याचे म्हटले जाऊ लागले. यावर शिवसेना शिंदे गटाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. माजी मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिंदेचे दरे गावी जाण्याचे कारण स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे नाराज नाहीत. त्यांनी ठाण्यात आणि दिल्लीतही पत्रकारांशी बातचीत केली आणि भाजपचे केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्री पदाबद्दल जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असल्याचे सांगितले आहे. मंत्रिमंडळातील खाते वाटपावर महायुतीचे तिन्ही नेते, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र बसून निर्णय घेतील, असेही सामंत म्हणाले.
एकनाथ शिंदे यांची धावपळ जास्त झाली. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना काल रात्री हलका ताप होता आणि सर्दी देखील झाली आहे. त्यामुळे आराम करण्यासाठी ते दरे गावी गेले आहेत. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा ही वायफळ असल्याचे सामंत म्हणाले.
विरोधकांनी आमची चिंता सोडून आत्मपरिक्षण करावे
शिवसेनेच्या सर्व आमदारांनी एकनाथ शिंदे यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. त्यांनी सरकारमध्येच राहावे अशी इच्छा आम्ही त्यांच्याकडे व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार स्थापन होणार. लवकरात लवकर शपथविधी होईल, असे सांगत सामंत यांनी विरोधकांनी आता त्यांचा विरोधी पक्षनेताही का होऊ शकला नाही यावर आत्मचिंतन करावे असा टोला लगावला.
2019 मध्ये सरकार स्थापन करण्यास किती दिवस लागले…
याआधी 2014, 2019 मध्येही सराकर स्थापन करण्यास उशिर झाला होता. 2019 मध्ये तर 36 ते 40 दिवस लागले होते, याचा विसर ठाकरे गटांच्या नेत्यांना पडला आहे का, असाही खोचक सवाल त्यांनी केला. काँग्रेसकडून ईव्हीएमवर आणि निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे, त्यावर सामंत म्हणाले, की नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला आहे. लातूरमध्ये काँग्रेसमधील देशमुख बंधू पैकी अमित देशमुख विजयी झाले तर धीरज यांचा पराभव झाला. तिथे ईव्हीएमने काम केले नाही का, असा उलट सवाल त्यांनी काँग्रेसला केला.
हेही वाचा : Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद घ्यावं म्हणून भाजप आग्रही; मोठं कारण आलं समोर
Edited by – Unmesh Khandale