अपात्रतेच्या कारवाईविरोधात शिंदे गटाची सुप्रीम कोर्टात धाव

petition claims that 38 MLAs withdrew their support to the Mahavikas Aghadi government

शिंदे गटाने अपात्रतेच्या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. गुवाहाटी येथे तळ ठोकून बसलेल्या शिवसेनेच्या बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या याचिकेवर महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी १६ आमदारांना अपात्रतेच्या नोटीसा बजावल्या आहेत. उद्या संध्याकाळपर्यंत ५.३० वाजेपर्यंत मत मांडण्याची १६ बंडखोरांना मुदत देण्यात आली आहे.

आज सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास एकनाथ शिंदे यांनी दाखल केलेल्या याचिकेत नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात मांडण्यात आलेल्या अविश्वास ठरावाला आव्हान देण्यात आले आहे. यामध्ये दोन स्वतंत्र याचिका असून त्यावर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या त्यांच्या याचिकेत अपात्रतेच्या नोटीसच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शिंदे यांच्याशिवाय अन्य १५ बंडखोर आमदारांना अशा प्रकारच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. शिवसेनेचे विधिमंडळ पक्षनेते अजय चौधरी यांच्या नियुक्तीलाही शिंदे गटाने आव्हान दिले आहे. त्यामुळे उद्या संध्याकाळपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे कोणतेही निर्देश किंवा स्थगिती न मिळाल्यास त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे, दादा भुसे यांच्यासह काही मंत्र्यांच्या नावांचा समावेश आहे. आतापर्यंत ९ मंत्र्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. जवळपास ४० आमदार हे शिंदे गटाच्या पाठीशी उभे आहेत. तर आज देखील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे गुवाहाटीत दाखल झाले आहेत. तसेच ते शिंदे गटात सामील झाले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रातील झपाट्याने बदलत असलेल्या राजकीय घडामोडींदरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मोठे पाऊल उचलले आहे. त्यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना सर्व आमदारांना सुरक्षा देण्याचे निर्देश दिले आहेत.


हेही वाचा : आम्हाला नागरिकांनी निवडून दिलं म्हणून तुम्ही सत्तेत आलात – दीपक केसरकर