विधानसभा कामकाज समितीतून शिवसेना बेदखल

विधिमंडळ अधिवेशनावेळी विधानसभेत काय काम चालेल हे निश्चित करणाऱ्या कामकाज सल्लागार समितीतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा गट बेदखल करण्यात आला आहे. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या १७ ऑगस्टपासून सुरू होत आहे.

राज्यभरातून मंत्रालयात तक्रारी घेऊन जाणाऱ्यांना दिलासा; आता 'या' ठिकाणी करा अर्ज

विधिमंडळ अधिवेशनावेळी विधानसभेत काय काम चालेल हे निश्चित करणाऱ्या कामकाज सल्लागार समितीतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा गट बेदखल करण्यात आला आहे. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या १७ ऑगस्टपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी विधानभवनात पार पडलेल्या विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला ठाकरे गटाच्या कोणत्याही आमदाराला निमंत्रण नव्हते. या समितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातून मंत्री दादा भुसे आणि उदय सामंत यांचा समावेश आहे. (Shiv Sena expelled from Assembly Working Committee)

विधानसभा कामकाज सल्लागार समितीत अधिकृत शिवसेनेच्या सदस्यांना समावेश न करण्याच्या निर्णयाला शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. या कामकाज सल्लागार समितीवर अधिकृत शिवसेनेच्या सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी निमंत्रण देण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेकडून विधिमंडळ प्रधान सचिवांना करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही अधिवेशनासंदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीला शिवसेना सदस्यांना बोलावण्यात आले नाही. यासंदर्भात शिवसेना गटनेते अजय चौधरी, पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन शिवसेनेचे सदस्य म्हणून समितीवर आपली नियुक्ती करावी, अशी मागणी केली.

विधानसभा कामकाज सल्लागार समितीत सर्व पक्षांतील सदस्यांची नियुक्ती करण्यात आली, मात्र अधिकृत शिवसेना सदस्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. आज विधानभवनात महाविकास आघाडीतील विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेदरम्यान शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनी सल्लागार समितीवरील सदस्यांच्या नियुक्तीचा विषय उपस्थित केला. यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षातील सदस्यांनी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली.

यावेळी शिवसेना हा अधिकृत पक्ष असून आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयातही यावर निर्णय झालेला नाही. विधिमंडळाच्या नियम १६४ नुसार मान्यताप्राप्त पक्ष, गट यांच्या प्रमुखांना कामकाज सल्लागार समितीवर सदस्य नेमण्याचा अधिकार असल्याचे नमूद आहे. त्यानुसार शिवसेनेचे सदस्य समितीवर नेमण्यात यावेत,अशी मागणी अजय चौधरी यांनी केली. त्यावर राहुल नार्वेकर यांनी नियुक्ती संदर्भातील पत्र देण्याची सूचना केली असता त्यांना अजय चौधरी आणि सुनील प्रभू यांची नियुक्ती करण्यात यावी असे पत्र देण्यात आले . यावेळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू, आमदार अनिल परब, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आदी उपस्थित होते.

कामकाज सल्लागार समितीवरील सदस्य

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली कामकाज सल्ल्लागार समितीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, मंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, दादा भुसे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील तर निमंत्रित सदस्य म्हणून नरहरी झिरवाळ, आशीष शेलार, अमीन पटेल, छगन भुजबळ यांचा समावेश आहे.

तर विधान परिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या अध्यक्षतेखालील कामकाज सल्लागार समितीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, भाजपचे प्रवीण दरेकर, विजय गिरकर, शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे, कॉंग्रेसचे भाई जगताप तर निमंत्रित सदस्य म्हणून चंद्रशेखर बावनकुळे, रणजितसिंह मोहिते पाटील, शेकापचे जयंत पाटील, शिक्षक आमदार कपिल पाटील, विलास पोतनीस यांचा समावेश आहे.


हेही वाचा – दोन दिवसात खातेवाटप होईल, तर सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत निवडणुका; सुधीर मुनगंटीवारांचे वक्तव्य