घरमहाराष्ट्रशिवसेनेत देसाई, रावतेंऐवजी नवे चेहरे सचिन अहिर, आमशा पाडवी यांना उमेदवारी

शिवसेनेत देसाई, रावतेंऐवजी नवे चेहरे सचिन अहिर, आमशा पाडवी यांना उमेदवारी

Subscribe

काँग्रेसने विधान परिषदेसाठी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे आणि मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांना उमेदवारी दिली आहे. मुंबई महापलिका निवडणुकीत पक्षाला बळ मिळावे या हेतूने काँग्रेसने दोन्ही उमेदवार मुंबईतील दिले आहेत. हंडोरे हे तत्कालीन विलासराव देशमुख सरकारमध्ये मंत्री होते.

विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेने भाकरी फिरवत नव्या चेहर्‍याना संधी दिली आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई तसेच माजी मंत्री दिवाकर रावते यांना सक्तीची विश्रांती देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सचिन अहिर आणि नंदुरबार जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांना उमेदवारी दिली आहे. ठाकरे यांनी राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेसाठी उमेदवारी देताना ग्रामीण भागातील शिवसैनिकाचा विचार केला आहे.

सुभाष देसाई हे ठाकरे सरकारमध्ये उद्योग, मराठी भाषा हे विभाग सांभाळत आहेत. राज्यात २०१९ मध्ये आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सुभाष देसाई यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यास शिवसेनेतून विरोध होता. तरीही उद्धव ठाकरे यांनी देसाई यांना मंत्री केले, परंतु आता ठाकरे यांनी देसाई यांना विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याने त्यांना पुढील सहा महिन्यांत मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

दिवाकर रावते हे गेली अनेक वर्षे विधान परिषदेत कार्यरत होते. सभागृहात त्यांनी शिवसेनेची बाजू तडफेने मांडली आहे. फडणवीस सरकारमध्ये रावते यांनी परिवहन खात्याची धुरा सांभाळली होती, परंतु ठाकरे सरकारमध्ये त्यांना संधी देण्यात आली नव्हती. आता विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्याने रावते यांना आता संघटनेत सल्लागाराची भूमिका बजावावी लागणार आहे.

काँग्रेसकडून हंडोरे, जगताप यांना उमेदवारी
काँग्रेसने विधान परिषदेसाठी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे आणि मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांना उमेदवारी दिली आहे. मुंबई महापलिका निवडणुकीत पक्षाला बळ मिळावे या हेतूने काँग्रेसने दोन्ही उमेदवार मुंबईतील दिले आहेत. हंडोरे हे तत्कालीन विलासराव देशमुख सरकारमध्ये मंत्री होते. २०१४ आणि २०१९च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला, तर मुंबई महापलिकेत काँग्रेसचे पुरेसे संख्याबळ नसल्याने भाई जगताप यांना मुंबई स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडणूक लढवता आली नव्हती. त्यामुळे काँग्रेसने त्यांना आता विधानसभा सदस्यांच्या मतदानाद्वारे विधान परिषदेवर पाठविण्याचे निश्चित केले आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादीचे उमेदवार गुलदस्त्यात
राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप आपले उमेदवार घोषित केले नाहीत. गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असून राष्ट्रवादीचे उमेदवार रात्री उशिरा किंवा सकाळी जाहीर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीत विधान परिषदेचे मावळते सभापती रामराजे निंबाळकर, एकनाथ खडसे, शिवाजीराव गर्जे यांच्या नावाची चर्चा आहे.

भाजप आणि शिवसेना उमेदवारांचे अर्ज दाखल
दरम्यान, भाजपचे प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि प्रसाद लाड यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तसेच शिवसेनेच्या सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांनीही विधान भवनात जाऊन आपले उमेदवारी अर्ज सादर केले. भाजपच्या उमेदवार उमा खापरे गुरुवारी अर्ज भरणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -