घरमहाराष्ट्रकार्यकारिणीत संयम रस्त्यावर आक्रमक

कार्यकारिणीत संयम रस्त्यावर आक्रमक

Subscribe

एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांविरोधात हाकालपट्टीची कारवाई नाही

दोन तृतीयांशपेक्षाही अधिक आमदारांसोबत बंड पुकारून पक्षाला अडचणीत आणणार्‍या शिवसेना नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदारांची हाकालपट्टी करण्याचा निर्णय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सेनेकडून घेण्यात येईल अशी अपेक्षा होती, परंतु कार्यकारिणीत बंडखोरांच्या हाकालपट्टीचा कोणताही ठोस निर्णय घेतला नसला तरी बाळासाहेबांचे नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही. तुम्ही तुमच्या बापाचे नाव लावा. हिंदुत्व शिवसेनेचेच आहे, अशी संयमी भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारच्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेतली, मात्र बंडखोरांविरोधात शिवसैनिकांनी राज्यात ठिकठिकाणी रस्त्यावर उतरत आक्रमक भूमिका घेत सेनेची पुढची दिशा काय असेल याची जाणीव करून दिली.

शिवसेना कार्यकारिणीच्या बैठकीतील ६ ठराव

=शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची होती, आहे आणि कायम राहील

- Advertisement -

=शिवसेनेची मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाशी बांधिलकी कायम राही

=पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर कार्यकारिणीचा विश्वास

- Advertisement -

=कायमशिवसेनेशी गद्दारी करणार्‍यांवर कठोर  कारवाईचे पक्षप्रमुखांना अधिकार

=बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव अन्य कु णाला वापरता येणार नाही.

=आगामी पालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकणारच

काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेनेला दाबण्याचे प्रयत्न -श्रीकांत शिंदे

 गेल्या अडीच वर्षांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून शिवसेनेला सातत्याने दाबण्याचे प्रयत्न झाले, असा थेट आरोप शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी केला. शिंदे यांनी शनिवारी ठाण्यात आपल्या समर्थकांसह मोठे शक्तिप्रदर्शन केले. यावेळी जाहीर सभेत बोलताना त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या सत्तेत भागीदारी पक्षांवर आरोप केले. ते म्हणाले की, अडीच वर्षांत शिवसेनेत इतका असंतोष कधीच उफाळून आला नव्हता, जो आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत आल्यानंतर आला आहे.

गेल्या अडीच वर्षांत राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न झाला. विशेषत: राष्ट्रवादी यात आघाडीवर होती. राष्ट्रवादीने शिवसेनेच्या आमदारांना जास्त त्रास देण्याचा प्रयत्न केला. आमदारांना येथे निधी मिळत नाही. आमदार आहोत पण आमच्या मतदारसंघातील भूमिपूजन राष्ट्रवादीचा पालकमंत्री करतो अशी येथील परिस्थिती आहे. निधी नगर विकास विभागाकडून मिळाला तर तो निधी थांबवण्याचे काम डीपीडीसीडीमधील राष्ट्रवादीचे पालकमंत्री करतात.अशा परिस्थितीत काम कसे करायचे? विरोधात होतो तेव्हा सांगू शकत होतो निधी मिळत नाही म्हणून, पण आज सत्तेमध्ये असून कामे होत नसतील, सामान्यांना न्याय देऊ शकत नसू तर काय फायदा, असेही ते म्हणाले.

१६ बंडखोर आमदारांना नोटीस सोमवारपर्यंत लेखी म्हणणे मांडा

शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना समर्थन देऊन गुवाहाटीत असलेल्या १६ आमदारांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शनिवारी नोटीस जारी केली आहे. पक्षादेशाचा भंग केल्याप्रकरणी येत्या सोमवारी सायंकाळपर्यंत तुमचे लेखी म्हणणे सादर करा, अन्यथा पुढील कारवाई होईल, असा इशारा या नोटिसीद्वारे दिला आहे. त्यामुळे बंडखोर शिंदे गट या नोटिसीवर निर्णय घेणार असून न्यायालयात आव्हान दिले जाणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा सदस्य (पक्षांतराच्या कारणावरून निरर्हत) नियम १९८६नुसार आपल्या बचावाचे लेखी म्हणणे सोमवारी २७ जूनला सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत उपाध्यक्षांना सादर करावे. आपण योग्य त्या कागदपत्रांसह उपरोक्त मुदतीत आपले लेखी अभिप्राय सादर न केल्यास आपल्याला प्रतोद यांच्या विनंती अर्जावर काहीही म्हणायचे नाही असे समजून पुढील कारवाई केली जाईल, असे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे.

पक्षादेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवत शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गटनेते अजय चौधरी यांनी १६ बंडखोर आमदारांना अपात्र करण्यासंदर्भात विधानसभा उपाध्यक्षांना विनंती केली होती. त्यानुसार झिरवळ यांनी १६ आमदारांना ई-मेलद्वारे नोटीस बजावली आहे. त्यामध्ये बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे.

नोटीस बजावण्यात आलेले आमदार
एकनाथ शिंदे, महेश शिंदे, अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, भरत गोगावले, संजय शिरसाट, यामिनी जाधव, लता सोनवणे, अनिल बाबर, बालाजी किणीकर, तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे, चिमणराव पाटील, संजय रायमूलकर, बालाजी कल्याणकर आणि प्रा. रमेश बोरनाळे.

कारवाई केल्यास न्यायालयात दाद मागणार-दीपक केसरकर
विधानसभा उपाध्यक्षांनी बजावलेल्या नोटिसीवर शिंदे गटाने सावध पवित्रा घेतला आहे. आजही आम्ही शिवसेनेतच आहोत. आम्ही पक्षाविरोधात कोणतेही गैरवर्तन केले नाही, असा दावा बंडखोर शिवसेना गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी केला. विधिमंडळ सभागृह सुरू नसताना असा पक्षादेश बजावता येत नाही. व्हीपचा संबंध विधानसभेच्या कामकाजाशी आहे. पक्षाच्या बैठकीशी त्याचा काहीही संबंध नाही, मात्र अशा नोटिसा काढून आम्हाला घाबरवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आपले बहुमत संपुष्टात आल्याने या क्लुप्त्या केल्या जात आहेत. त्याचा काहीही परिणाम होणार नाही. त्यांनी आमच्यावर कारवाई केल्यास आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत, असे केसरकर यांनी सांगितले.

हिंमत असेल तर तुमच्या बापाच्या नावाने मते मागा
तुम्हाला जर मते मागायची असतील, तर तुमच्या बापाच्या नावावर मागा. आमच्या बापाच्या नावावर मते मागू नका. आधी नाथ होते, आता दास झाले. बंडखोरांनी त्यांचा निर्णय घ्यावा. शिवसेना निखारा आहे. पाय ठेवाल तर जळून जाल.– उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -