शिवसेना नवीन चिन्हाचा विचार करत नाही, उद्धव ठाकरे यांचा विश्वास

संभ्रमातून तमाम नागरिक आणि शिवसैनिकांना हेच सांगतोय की तुम्ही अजिबात त्यांच्या भ्रमाच्या भोपळ्यात अडकू नका, असे  उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले

मुंबई : शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणाबद्दल चर्चा चालली आहे. कायद्याच्या दृष्टीने बघितले आणि घटनेत जे काही नमूद केले आहे, त्यानुसार धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे ती चिंता सोडा, असा ठाम विश्वास शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना देतानाच जे काही घडलेय ते महाराष्ट्रातील जनतेला मान्य नाही. तेव्हा असे खेळ खेळण्यापेक्षा विधानसभा निवडणुका घ्या, असे आव्हान भाजपला दिले आहे.

चिन्ह म्हटल्यानंतर मतदानपत्रिकेवरील चिन्ह जे महत्त्वाचे असते तो आपला धनुष्यबाण आहे आणि ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. पण नुसत्या धनुष्यबाणावर लोक विचार करीत नाहीत.तर धनुष्यबाण घेतलेल्या माणसाचीही चिन्हे लोक बघतात की याची चिन्हे बरोबर दिसत नाहीत. अगदी शिवसेनेचा उमेदवार असला तरी लोक विचार करूनच मतदान करीत असतात, हेच मी शिवसैनिकांना पटवून दिले. याचा अर्थ नवीन चिन्हाचा विचार करतोय, असे बिल्कूल नाही. शिवसेनेपासून धनुष्यबाण कोणीही वेगळा करू शकत नाही, हे मी ठामपणे सांगतो. हे घटनात्मक आणि कायदेशीर अभ्यासक आहेत त्यांच्याशी बोलूनच सांगत आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.

शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात धनुष्यबाण चिन्हावरून जोरदार रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचे निवडणूक चिन्ह शिवसेनेकडेच असेल, असे ठामपणे सांगितले. धनुष्यबाणाविषयी संभ्रम मनात ठेवू नका. धनुष्यबाण हा शिवसेनेचा आहे आणि शिवसेनेकडेच राहील, हे घटनातज्ज्ञांशी बोलूनच मी आपल्याशी बोलतो आहे. शिवसेना हा पक्ष विधिमंडळात आहे. तिथे जे १५-१६ आमदार आज माझ्यासोबतत आहेत,त्यांचे मला कौतुक करायचे आहे. त्यांच्यात कैलास  पाटील, नितीन देशमुख यांच्यासह बाकीचे आहेतच. त्यांना दडपणे, आमिषे दाखविण्यात आली, त्यांनासुद्धा धमक्या दिल्या गेल्या. पण वाटेल ते होवो आम्ही हटणार नाही, ही त्यांची जिगर. अशा जिगरीची माणसे जिथे असतात तिथे विजय हा नक्कीच असतो, असे ठाकरे यांनी सांगितले.

शिवसेना कोणाची, हा मुद्दा उपस्थित केला जात आहे . पण शिवसेना ही एखादी वस्तू नाही की  कोणी चोरून नेऊ शकेल,असे ठणकावतानाच ठाकरे यांनी विधिमंडळ पक्ष आणि रस्त्यावरचा पक्ष या मुद्द्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, विधिमंडळ पक्ष आणि रस्त्यावरचा पक्ष असा फरक सांगितला जातोय. शेवटी रस्त्यावरचा पक्ष हा जनतेच्या न्याय्यहक्कासाठी रस्त्यावर उतरत असतो. जनता त्याला आशीर्वाद देत असते. मग त्या पक्षाच्या माध्यमातून हे लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत, जिल्हापरिषदा, नगरपंचायती, महापालिका, विधानसभा, लोकसभेत जात असतात.

धरून चला की कधी काळी आमचा एकच आमदार होता. वामनराव होते, छगनराव होते असे एक एक आमदार होते, तेच जर का पक्ष सोडून गेले… एक आमदार पक्ष सोडून गेला तर पक्ष संपला का… तर तो नाही संपू शकत. एक आमदार असो ५० असो की १०० असोत हे सगळेच्या सगळे जरी सोडून गेले तरी पक्ष अस्तित्वात असतो. आमदार जाऊ शकतात. पक्ष जाऊ शकत नाही. हा जो लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, त्या संभ्रमातून तमाम नागरिक आणि शिवसैनिकांना हेच सांगतोय की तुम्ही अजिबात त्यांच्या भ्रमाच्या भोपळ्यात अडकू नका, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

विधिमंडळ पक्ष हा वेगळा असतो आणि नोंदणीकृत  पक्ष हा वेगळा असतो.ज्यात असंख्य मतदार, नागरिक, सदस्य आले, पदाधिकारी आले. त्या पदाधिकार्‍यांना असेच उचलून कोणी घेऊन जाऊ शकत नाही. सगळ्यांनाच आमिष देऊन, दमदाट्या करून तुम्ही नेऊ शकत नाही, अशा शब्दांत  उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले.

जे काही आता फोटो येत आहेत की एवढे नगरसेवक गेले, तेवढे नगरसेवक गेले. मुळात आता सर्व महापालिका, पालिका अस्तित्वात नाहीत. त्याच्यामुळे जे गेलेले दाखवाताहेत ते त्यांचे व्यक्तिगत कार्यकर्ते असू शकतात. त्यांच्या आग्रहामुळे मी माझ्या निष्ठावान सैनिकांना बाजूला ठेवून यांच्या शिफारशीमुळे यांना उमेदवारी दिली होती असे लोक गेले असतील. शिवसेनाभवनमध्ये राज्यातल्या महिला जिल्हाप्रमुख आल्या होत्या, त्या वाघिणीसारख्या बोलत होत्या.पण त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते. साधेसुधे शिवसैनिक येताहेत, ज्यांचे तळहातावर पोट आहे. असे लोक येताहेत रडताहेत. या साध्या लोकांमुळे मोठेपण मिळाले, लोकं मोठी झाली ती गेली. ज्यांनी मोठं केलं ती मोठ्या हिमतीची साधी माणसं ही आजसुद्धा शिवसेनेसोबत आहेत. ही जोपर्यंत शिवसेनेत आहेत तोपर्यंत शिवसेनेच्या भवितव्याला कोणीही धोका पोहोचवू शकत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

११ जुलैचा निकाल  लोकशाहीचे भवितव्य ठरवणारा असेल
आजही देशामध्ये असत्यमेव हे वाक्य नाही तर सत्यमेव जयते हेच वाक्य आहे. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे.  न्यायमंदिरावर विश्वास आहे. येत्या ११ तारखेला जो काही निकाल लागेल, जी सुनावणी सुरू होईल; तो निकाल केवळ शिवसेनेच्या भवितव्याचा नसणार आहे. शिवसेनेचे काय होईल…त्यासाठी शिवसैनिक मजबूत आहेत. शिवसेनेला काही वाकडे होऊ न देण्याची ताकद आजही शिवसैनिकांच्या मनगटात आहे. मात्र हा जो खटला आहे. त्यात देशात लोकशाहीचे अस्तित्व, लोकशाहीचे भविष्य किती काळ टिकणार आहे. लोकशाही किती मजबूत राहणार आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली जी घटना आहे त्या घटनेनुसार आपल्या देशाचा कारभार यापुढे होणार आहे की नाही हे ठरवणारा आणि देशाच्या एकूण वाटचालीला दिशा दाखवणारा हा निकाल असणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

जी गोष्ट सन्मानाने झाली असती ती घातपाताने का केलीत?
भाजपने घात केल्याने आम्ही महाविकास आघाडीला जन्म दिला. आज जे काही त्यांनी घडवलेले आहे ते अडीच वर्षांपूर्वी केले असते तर ते सन्मानाने झाले असते. जे खर्चाचे तीन हजार कोटींचे आकडे येताहेत, ते फुकटात झाले असते. जी गोष्टी सन्मानाने  झाली असती ती घातपाताने का केलीत. जी गोष्ट दिलदारपणे झाली असती ती एवढा खर्च करून का केलीत, असा सवाल  उद्धव ठाकरे यांनी  केला.


हेही वाचाः महावितरणकडून वीज दरात मोठी वाढ; महाराष्ट्राच्या जनतेला बसणार आर्थिक फटका