साळवींना मतदान करण्यासाठी सेनेकडून आमदारांना व्हीप जारी, शिंदे गटाची भूमिका काय?

महाराष्ट्रात सत्तापालट झाली असून महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री असे समीकरण राज्यात आल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदासाठी राजकीय नाट्य सुरू आहे. भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेकडूनही उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने कोकणातील राजापूर मतदार संघातील आमदार राजन साळवी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल नार्वेकर आणि राजन साळवी यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून व्हीप जारी करण्यात आला आहे.

शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी शिवसेनेतील विधानसभेच्या सदस्यांसाठी व्हीप जारी केला आहे. तसचे त्यांनी संपूर्ण वेळ विधानसभा सभागृहात उपस्थित राहून राजन साळवी यांनाच मतदान करावे, असा पक्षादेश काढण्यात आला आहे. त्यासंदर्भातील पत्र सुद्दा जारी करत सर्व आमदारांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता शिंदे गटाची यावर कोणती भूमिका असणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.


हेही वाचा : अजित पवार अद्यापही कोरोनाच्या विळख्यात, बहुमत चाचणीला उपस्थित राहणार का?