घरमहाराष्ट्रशिवसेनाच किंगमेकर!

शिवसेनाच किंगमेकर!

Subscribe

पुन्हा एकदा आपलंच सरकार… असं सांगत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत २२०च्यावर आम्ही जाणार, असे छातीठोकपणे सांगणार्‍या भाजप आणि शिवसेना महायुतीचे सरकार येणार, हे आता निश्चित झाले आहे. मात्र, खरी गंमत आता पुढे आहे. भाजप १०४ जागांवर अडखळल्यामुळे पाच वर्षे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि महत्वाची मंत्रीपदे आपल्याकडेच, हे भाजपने रंगवलेले स्वप्न आता साकार होणार नाही. नव्या सरकारमध्ये शिवसेना किंगमेकर ठरणार आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी लागला. भाजप आणि शिवसेनेच्या बाजूने निकाल यायला सुरुवात झाल्यानंतर युतीच्या समर्थकांनी दिवाळीआधी फटाके फोडायला सुरुवात केली.

युती २०० पार करेल असे वाटत असताना हळूहळू राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे १०० उमेदवार जिंकून यायला सुरूवात झाली आणि सत्ताधार्‍यांच्या गोटात एकच शांतता झाली. बहुमतासाठी १४५ आमदारांची आवश्यकता असून दोघांना १६० जागा मिळाल्याने पुन्हा युतीचेच सरकार येणार हे अधोरेखित आहे. रात्री उशीरापर्यंत मित्रपक्षांसह १६४ जागा लढवून भाजपच्या हाती १०४ जागा लागल्या. तर १२४ जागा लढवणार्‍या शिवसेनेला जेमतेम ५६ जागा मिळाल्या. भाजप १२२ आमदारांवरून १०४ जागांवर तर शिवसेना ६३ वरून ५६वर घसरली आहे. मनसेने यावेळी खाते उघडले असून वंचित आघाडीने मात्र भोपळा फोडला नाही. बहुजन विकास आघाडीला ३ एमआयएमला २ जागा तर बंडखोर असे २३ उमेदवार निवडून आले.

- Advertisement -

शिवसेनेने पाच वर्षांपूर्वी ६३ जागा जिंकल्या होत्या. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला यावेळी ५6 जागांवर समाधान मानावे लागले. एक्झिट पोलमध्ये भाजप १२२ च्या पार जाणार आणि शिवसेना ८० जागा मिळणार असे सांगितले जात होते आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस २०१४ चा आकडाही गाठणार नाही, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र या अंदाजाचा बार फुसका निघाल्याने विरोधक सन्मानाने उभारताना दिसला. शरद पवार यांच्या करिष्म्याची जादू दिसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने जागांचे अर्धशतक पार करताना ५4 उमेदवार निवडून आणले. तर निवडणुकीच्या रणधुमाळीत फारसा आवाज न दिसलेल्या काँग्रेसने ४5 जागा जिंकून सर्वांना मोठा धक्का दिला. राज ठाकरे यांच्या मनसेने खाते उघडताना एक जागा जिंकली. कल्याण पश्चिममधून प्रमोद उर्फ राजू पाटील हे जिंकून आले.

विशेष म्हणजे भाजप आणि शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी झाल्याने त्याचा परिणाम होऊन अपक्षांची ताकद वाढून २3 झाली आहे. या अपक्षांपैकी १५ उमेदवार आपल्याशी संपर्कात असल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे. निकालाचे अपेक्षित चित्र बदलल्याने आता शिवसेनेचा सूर बदलेला दिसला. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत वरचा आवाज लावताना, ‘आता आम्ही भाजपच्या सगळ्या अडचणी समजू शकणार नाही. सत्ता स्थापनेची घाई नाही, पण सर्व पर्याय आम्हाला खुले असतील’, असे सांगत भाजपला एकप्रकारे इशारा दिला आहे. मुख्य म्हणजे मुख्यमंत्री कोणाचा? यावर त्यांनी सत्तेच्या ५०-५० फॉर्म्युल्याची आठवण करून दिली. सत्ता स्थापन करताना शिवसेना अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद आणि समसमान महत्वाची खाती हे प्रस्ताव ठेवणार, हे आता निश्चित झाले आहे. या चर्चेत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्याचे शिवसेनेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पावले उचलली जातील, असा रागरंग दिसत आहे. बहुमतासाठी युतीला 145 आमदारांची आवश्यकता आहे. मात्र युतीकडे 160 आमदारांचे संख्याबळ आहे.

- Advertisement -

भाजपचा दावा फोल ठरला
भाजपने गेल्यावेळी निवडणूक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी वर्णी लावली होती. तर यावेळी ही निवडणूक खर्‍या अर्थाने फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढण्यात आली होती. निवडणुकीआधी फडणवीस यांनी राज्यात महाजनादेश यात्रा काढून सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत नेण्याचे काम केले होते. या यात्रेला मिळालेल्या प्रतिसादावर बोट ठेवत भाजपला मोठा महाजनादेश मिळेल, असे दावे करण्यात येत होते. भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करू शकेल, अशी स्थिती असेल तसेच महायुतीला २२० पेक्षा अधिक जागा मिळतील, असेही काही नेते सांगत होते. मात्र, हे सर्व दावे फोल ठरले आहेत.

सत्तेची सूत्रे बदलणार
भाजपचा आकडा कमी झाल्याने शिवसेनेच्या आवाजाला नवी धार चढू लागली आहे. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी सत्तेत समान वाटा मिळाला पाहिजे आणि ‘आमचं ठरलंय’, या उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला आहे. पुढच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल, असे वक्तव्य राऊत यांनी यंदाच्या दसरा मेळाव्यात केले होते. त्याचे स्मरणही राऊत पुन्हा करून देत आहेत. त्यामुळेच पुन्हा सत्ता युतीचीच असेल हे स्पष्ट असले तरी सत्तेचे सूत्र मात्र मोठ्या प्रमाणात बदलणार आहे, असे संकेत मिळत असून त्यादृष्टीने दोन्ही पक्षांत खल सुरू झाला आहे.

फडणवीसांच्या खुर्चीला धोका?
राज्यात भाजपची झालेली घसरण हे फडणवीस यांचे अपयश असल्याचा सुप्त सूर भाजपमधील दुखावलेले निष्ठावंत नेते काढू लागले आहेत. त्याची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतल्यास फडणवीस यांच्या खुर्चीला धोका निर्माण होऊ शकतो, असेही जाणकारांचे म्हणणे आहे. दुसरीकडे सत्तेत समान वाटा या मागणीवर शिवसेना ठाम राहिल्यास भाजपची चांगलीच गोची होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -