महाराष्ट्राचं खच्चीकरण हे खोके सरकारचं ध्येय; आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र

aaditya thackeray

राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारमधील मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यातून सुटकेशी केली. ज्यामुळे राज्यात नव्या राजकीय वादाला तोंड फुटले. यापूर्वीही काही भाजप नेत्यांनी छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह विधान केली होती. त्यामुळे विरोधकांकडून या वाचाळवीरांना आवरा नाही तर त्यांची हकालपट्टी करा, अशी आक्रमक भूमिका घेतली जात आहे. यावर आता ठाकरे गटातील आमदार आदित्य ठाकरे यांनी ही टीकास्त्र डागले आहे. आदित्य ठाकरेंनी एक ट्विट करत राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या हिंदुत्वाबद्दलच्या भूमिकेवर टीका केली आहे.

आदित्य ठाकरे ट्विट करत म्हणाले की, इमान विकलेल्या गद्दारांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणं हे हिंदुत्व नाही, हा महाराष्ट्र द्वेष आहे! महाराष्ट्राचं खच्चीकरण हेच या खोके सरकारचं ध्येय आहे!, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.

दरम्यान बुधवारी (30 डिसेंबर) साताऱ्यातील प्रतापगड येथे शिवप्रताप दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात बोलताना मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना आग्र्यातून सुटकेशी केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने आग्र्यातील किल्ल्यात ठेवले होते. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी आग्र्यातून नाट्यमयरित्या सुटका करून घेतली. ते तिथून सुटून बाहेर आले त्यामुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना करु शकले, त्याचप्रकारे एकनाथ शिंदे यांनी रोखण्याचे खूप प्रयत्न झाले. मात्र एकनाथ शिंदे बाहेर पडले. असे विधानही मंगलप्रभात लोढा यांनी केले होते.


अरविंद केजरीवालांच्या रॅलीत चोरांचा सुळसुळाट; आपच्या नेत्यांचे मोबाईल चोरीला