सोमय्यांविरोधात अब्रूनुकसानीचा खटला – अनिल परब

ED interrogated Anil Parab for 7 hours

दापोली रिसॉर्टशी माझा काहीही संबंध नाही. मी काहीही चुकीचे केलेले नाही. तरीदेखील भाजप नेते किरीट सोमय्या सातत्याने मी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करीत आहेत. त्यामुळे मी किरीट सोमय्या यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला आहे. या खटल्यात जे पुरावे द्यायचे आहेत ते मी देईन. तेव्हा त्यांना माफी मागावी लागेल किंवा कारवाईला सामोरे जावे लागेल, असे शिवसेना आमदार अ‍ॅड. अनिल परब म्हणाले. ते गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

मी किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर देण्यास बांधिल नाही. ज्यांचा या प्रकरणाशी संबंध आहे ते माझे मित्र आहेत. दापोली येथील रिसॉर्टशी माझा काहीही संबंध नाही, हे मी वेळोवेळी सांगितले आहे. दापोली रिसॉर्टची मालकी सदानंद कदम यांनी कबूल केली आहे. सातबार्‍यावर त्यांचे नाव आहे. या प्रकरणाची ईडी आणि स्थानिक प्राधिकरणाने चौकशी केली आहे. स्थानिक प्राधिकरण तसेच न्यायालय जो निर्णय देईल त्या आदेशाचे आम्ही पालन करू. रिसॉर्ट पाडायचे असेल तर संबंधित यंत्रणांनी तसा आदेश द्यावा. यंत्रणा जो आदेश देतील त्याचेही पालन होईल, असे आमदार अ‍ॅड. अनिल परब म्हणाले.

दिवाळीपर्यंत रिसॉर्ट जमीनदोस्त- सोमय्या
परबांच्या दापोली रिसॉर्टप्रकरणी आज राष्ट्रीय हरित लवादासमोर सुनावणी होणार आहे. दापोली येथील रिसॉर्टवर नवरात्रोत्सवात कारवाई सुरु होईल. दिवाळीपर्यंत हा रिसॉर्ट जमीनदोस्त झालेला असेल, असा दावा गुरूवारी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला.