शिवसेनेच्या जाधवांचे राष्ट्रवादीतील पुत्र विक्रांत जाधव गुहागरमधून आमदारकीसाठी लढणार

shiv sena leader bhaskar jadhav son vikrant jadhav want to fight guhagar MLA candidate
शिवसेनेच्या जाधवांचे राष्ट्रवादीतील पुत्र विक्रांत जाधव गुहागरमधून आमदारकीसाठी लढणार

शिवसेनेतील आक्रमक नेत्यांपैकी एक असलेले आमदार भास्कर जाधव यांच्या मुलाला सुद्धा आता आमदारकीचे वेध लागले आहेत. भास्कर जाधव यांचा मुलगा आणि राष्ट्रवादीत असलेले विक्रांत जाधव यांनी गुहागरमधून निवडणूक लढणार असल्याचे वक्तव्य केले आहे. दरम्यान विधानसभा निवडणुका अजून दूर असल्या तरी नेत्यांनी तयारी सुरु केली असल्याचे दिसत आहे. दरम्यान विक्रांत जाधव राष्ट्रवादीकडून जागा लढवणार का? शिवसेनेकडून लढवणार असा प्रश्न पडला आहे. सध्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव हे या मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. भास्कर जाधव २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सहदेव बेटकर यांच्याविरोधात निवडून आले आहेत.

शिवसेना नेते भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव राष्ट्रवादीमध्ये आहे. राष्ट्रवादीतून शिवसेनेत भास्कर जाधव यांनी प्रवेश केल्यानंतर मुलगा मात्र राष्ट्रवादीतच राहिला आहे. विक्रांत जाधव रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर होते. सध्या झेडपीची मुदत संपली आहे. दरम्यान आता निवडणूक लढवणार असल्याचे वक्तव्य विक्रांत जाधव यांनी केले आहे.

गुहागरमधून निवडणूक लढवणार – विक्रांत जाधव

गुहागर मतदारसंघ रत्नागिरी जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाचा आहे. सध्या शिवसेनेचे विद्यमान आमदार भास्कर जाधव या मतदारसंघातून आले आहेत. विक्रांत जाधव म्हणाले की, गुहागर मतदार संघातून निवडणूक लढवणार आहे. भास्कर जाधव यांचे राजकीय वारसदार आणि लोकप्रतिनिधी म्हणून नक्कीच चांगले काम करेल. वडिलांकडून जनसेवेचा वारसा मिळाला आहे. तो वारसा पुढे चालवण्याची इच्छा असल्याचे विक्रांत जाधव यांनी सांगितले.

पक्ष नेतृत्वाची तारांबळ उडणार

भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला परंतु त्यांचे पुत्र विक्रांत जाधव राष्ट्रवादीतच राहिले आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अंजनवेल (गुहागर) गटामधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले. या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून भास्कर जाधव यांच्या भावाचा मुलगा बाळशेठ जाधव शर्यतीमधअये होता. महाविकास आघाडीमध्ये जाधवांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे कमालीचे नाराज होते. यामुळे त्यांच्या मुलाचा जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा करण्यात आला. आता विक्रांत जाधव यांनी इच्छा व्यक्त केली आहे परंतु कोणत्या पक्षाकडून लढणार याबाबत वक्तव्य केले नाही. यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वांपुढे तिकीट वाटणीत तारांबळ उडणार आहे.


हेही वाचा : हिंदुत्वावरून पुन्हा एकदा सेना-भाजप आमनेसामने, आता संजय राऊत म्हणतात…