‘ती’ जखम आजही राज ठाकरेंच्या मनाला बोचतेय; नीलम गोऱ्हेंचं जहरी टीकास्त्र

shiv sena leader neelam gores criticism on raj thackeray eknath shinde

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. यात मनसेनेही कार्यकर्ते, गटनेते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका, मेळाव्यांचा धडाका सुरु केला आहे. यात मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी मुंबईत पक्षाच्या गटाध्यक्षांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात राज ठाकरेंनी राहुल गांधींसह उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली. तसेच उद्धव ठाकरेंची नक्कल करून दाखवली, यावरून आता शिवसेना नेत्यांकडून राज ठाकरेंच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी राज ठाकरेंच्या टीकेवर बोचरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. ती जखम आजही राज ठाकरेंच्या मनाला बोचतेय. त्यामुळे ते अशाप्रकारची बेताल टीका करतात. अशा शब्दात नीलम गोऱ्हेंनी राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. आज सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. जे व्यंग नाहीत त्याला शोधून आणायचे आणि मिमिक्री करायची याला दूषित दृष्टी म्हणतात किंवा सडलेली दृष्टी म्हणतात. असा घणाघातही गोऱ्हेंनी केला आहे.

मुख्यमंत्री शिंदेंचाही घेतला समाचार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फ्रिज खोकेबाबतची टीका निराधार आहे. परिस्थितीमुळे एकनाथ शिंदे मजबूर आहेत. उद्धव ठाकरेंवर टीका केल्याशिवाय त्यांना प्रसिद्धी मिळत नाही, जसं नारायण राणेंचं झालं तसचं शिंदे गटाचं झाल असं वाटतय, म्हणत नीलम गोऱ्हेंनी मुख्यमंत्री शिंदेंचा समाचार घेतला आहे.

बेळगाव – महाराष्ट्र सीमाप्रश्नावरूनही शिंदे सरकारवर बरसल्या

महाराष्ट्राच्या निर्मितीमागे मोठा इतिहास आहे. बिदर भालकी बेळगावसह अन्य भाग महाराष्ट्राला जोडले गेले पाहिजे ही आपली भूमिका आहे. भाषावार प्रांतरचनेनुसार राज्यांची निर्मिती झाली असली तरी बेळगावात मराठीचा अपमान होतो तसा महाराष्ट्रात कानडीचा अपमान होत नाही. सामोपचाराचा वसा केवळ महाराष्ट्राने घेतलेला नाही, कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीने वक्तव्य करतात त्याद्वारे न्याय संस्थेवर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न असावा. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचे वर्तन म्हणजे केंद्राच्या बिघडलेल्या लाडक्या बाळाप्रमाणे आहे, ते अगदी हायपाय आपटत आहेत. त्यांच्यामागे नक्कीच कुणीतरी आहे. महाराष्ट्राचा अभिमन्यू करण्याचा हेतू मराठी द्वेषी लोकांचा आहे असं वाटतंय, असा आरोपही नीलम गोऱ्हे यांनी केला आहे.


भगतसिंह कोश्यारी पदमुक्त होण्याआधीच संजय राऊतांना आनंद, म्हणाले महाराष्ट्राच्या शत्रूंशी…