…लवकरच गौप्यस्फोट करणार, शिवसेना नेते रामदास कदम यांची माहिती

रामदास कदम नेमका काय गौप्यस्फोट करणार?

मुंबई :  मी कडवा शिवसैनिक असून शेवटपर्यंत भगव्याशी बेईमानी करणार नाही. मी लवकरच पत्रकार परिषद गेऊन अनेक गोष्टींचा खुलासा करून गौप्यस्फोट करणार आहे, असे शिवसेना नेते रामदास कदम यांनी बुधवारी येथे सांगितले. त्यामुळे आता रामदास कदम नेमका काय गौप्यस्फोट करणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे.

कदम यांची अलिकडेच एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे शिवसेनेत उलट सुलट चर्चा सुरू झाली होती. परिवहन मंत्री अनिल परब यांची रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील रिसॉर्ट आणि बंगल्याची माहिती रामदास कदम यांनी त्यांचे पीए प्रसाद कर्वे नामक व्यक्तीच्या माध्यमातून भाजप नेते किरीट सोमय्या यांना दिल्याचा गंभीर आरोप माजी आमदार संजय कदम यांनी केला होता. पुराव्यादाखल त्यांनी ऑडियो क्लिपही सादर केली होती.

त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कदम यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. या नाराजीमुळे कदम यांना मुंबईतून विधान परिषदेची उमेदवारी मिळणार नसल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्रद्धांजली वाहण्यासाठी शिवाजी पार्क येथे आलेल्या  कदम यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

मराठी माणूस ताठ मानेने जगतोय तो बाळासाहेबांमुळेच. आमच्यासारख्या झोपडपट्टीत राहणाऱ्यांना बाळासाहेबांनी मोठे केले. मी कडवा शिवसैनिक असून शेवटपर्यंत भगव्याशी बेईमानी करणार नाही. मी लवकरच पत्रकार परिषद गेऊन अनेक गोष्टींचा खुलासा करणार आहे, असे  कदम यांनी सांगितले.


हेही वाचा: झिशान सिद्दीकीच्या हायकमांडला पत्राच्या वादावर भाई जगताप म्हणाले…. हा माझ्या घरातला