Coronavirus: ‘फक्त भारत माता की जय बोलून राष्ट्रवाद सिद्ध करता येत नाही’

sanjay raut
खासदार संजय राऊत

देशात आणि राज्यात करोना विषाणू हायपाय पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या उपायोजना राबवत आहेत, त्या योग्य असून आमचा त्याला पाठिंबा आहे. मात्र या परिस्थितीतही काही लोक काळजी घेत नसल्याचे सांगत राऊत म्हणाले की, “फक्त भारत माता की जय म्हणणे एवढाच राष्ट्रवाद होत नाही, तर आरोग्य आणीबाणीच्या प्रसंगी सरकारचे निर्देश मानने हे सुद्धा राष्ट्रवादासारखेच असते.”

संजय राऊत पुढे म्हणाले की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या आणीबाणीच्या प्रसंगी चांगले काम करत आहेत. मात्र काही लोक उगाच राजकारण करत आहेत. मोदींनी ज्याप्रकारे जनता कर्फ्यू बाबत सांगितले त्याला आम्ही विरोधी पक्ष पाठिंबा देत आहोत. मात्र जे विरोधक सरकारचे निर्देश पाळत नाहीयेत, त्या राजकारण करणाऱ्या विरोधकांनाच आता क्वॉरंटाइन करण्याची गरज आहे. देश सध्या संकटात असून सर्वांनीच एकत्र येऊन याचा सामना केला पाहीजे.”

महाराष्ट्राला करोनाच्या चाचण्या घेण्यासाठी लागणारे किट्स केंद्राकडून वेळेवर मिळत नसल्याची टीका काही लोक करत आहेत. याबाबत संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी योग्य उपाययोजना करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रावर कोणताही आरोप केलेला नाही. मात्र स्वतःला जे पुढारी समजतात त्या सर्वांनाच आज जागृतीची गरज आहे. सामान्य जनतेने स्वतःला या लढाईत सामावून घेतले आहे. बॉलिवूडची गायिका कनिका कपूरच्या पार्टीत काही खासदार गेल्यामुळे टिका केली जात आहे. वास्तविक अशावेली जबाबदार व्यक्तिंनी सामाजिक भान जपणे गरजेचे आहे.”