राज्यात कोणाचाही अल्टिमेटम चालणार नाही

राज्यात कोणाचाही अल्टिमेटम चालणार नाही, फक्त ठाकरे सरकारचा शब्द चालणार, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मशिदींवरील भोंग्यांवरून राज्य सरकारला अल्टिमेटम देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ठणकावले आहे.

sanjay raut

राज्यात कोणाचाही अल्टिमेटम चालणार नाही, फक्त ठाकरे सरकारचा शब्द चालणार, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मशिदींवरील भोंग्यांवरून राज्य सरकारला अल्टिमेटम देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ठणकावले आहे. कुठलेही राज्य हे अल्टिमेटमवर चालत नाही, तर कायद्याने चालते. महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणा सक्षम आहेत. नेतृत्व सक्षम आहे. सरकार भक्कम आहे. तरीही कोणी राज्यात अनागोंदी माजवून राज्य अस्थिर करण्याचे प्रयत्न करत असेल तर ते फार मोठी चूक करत आहेत, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

व्यक्ती कितीही मोठी असली तरी नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल होत असतात. आमच्यावर देखील अनेकवेळा गुन्हे दाखल झाले आहेत. आम्ही केलेल्या लिखाणावर, आमच्या वक्तव्यावर, भूमिकांवर अनेकांनी आक्षेप घेऊन आमच्याविरोधात पोलिसांत तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामुळे त्यात नवीन असे काहीच नाही. कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांना अटक करायची की नाही याबद्दलची भूमिका सरकार ठरवेल. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे राज्य आहे. राज्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था आहे, असे राऊत म्हणाले.

मुंबईत गडबड करण्याचा प्रयत्न
राज्याबाहेरून काही गुंड प्रवृत्तीचे लोक मुंबईत आणून गडबड करायची. असा काही लोकांचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. शेवटी हे सुपारीचे राजकारण आहे. पण या सुपार्‍या ज्या आहेत या राज्यात चालणार नाहीत. मुंबईचे आणि राज्याचे पोलीस परिस्थिती हाताळण्यास सक्षम आहेत. गृहखात्याचे नेतृत्व सक्षम आहे. सगळ्या घडामोडींवर मुख्यमंत्र्यांचे लक्ष आहे. त्यामुळे फार कोणी चिंता करण्याची गरज नाही, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.