Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी वालावलचे शिवसेना शाखाप्रमुख संतोष मुणगेकर यांचं आकस्मिक निधन

वालावलचे शिवसेना शाखाप्रमुख संतोष मुणगेकर यांचं आकस्मिक निधन

Related Story

- Advertisement -

कुडाळ मधील वालावल गावचे शिवसेना शाखाप्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष वसंत मुणगेकर यांचे बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आकस्मिक निधन झाले. वयाच्या ४५व्या वर्षी संतोष मुणगेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात आई, वडील आणि दोन विवाहित बहिणी, भाचे आणि खूप मोठा मित्रपरिवार आहे.

मनमिळाऊ- शांत स्वभावाचे, परोपकारी वृत्तीचे संतोष मुणगेकर यांचा शिवसेना पक्षाबरोबरच श्री देव लक्ष्मीनारायण मंदिर, देवी माऊली मंदिर यांच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या सामाजिक आणि लोकोपयोगी उपक्रमांमध्ये लक्षणीय सहभाग होता. गेली तीन वर्ष शिवसेना शाखाप्रमुख पदावर कार्यरत असलेले संतोष मुणगेकर यांना काही दिवसांपूर्वी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यावर त्यांनी पुन्हा एकदा सामाजिक कार्याला सुरुवात केली होती. राहत्या घरी बुधवारी पहाटे झोपेतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.

- Advertisement -

वालावल येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्काराला पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी गर्दी केली होती. संतोष मुणगेकर यांच्या अकाली निधनामुळे पंचक्रोशीसह तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रणजित देसाई, ज्येष्ठ विधीज्ञ संग्राम देसाई, माजी आमदार प्रमोद जठार, ज्येष्ठ पत्रकार राजेश कोचरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, सामाजिक कार्यकर्ते दयानंद चौधरी, दाजी कावळे, नेरुरचे सरपंच शेखर गावडे, वालावलचे सरपंच निलेश साळसकर यांनी शोक व्यक्त केला आहे.

- Advertisement -