Farmers Protest: शेतकऱ्यांची, देशाची माफी मागून चालणार नाही, मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबाना आधार देणे गरजेचे – संजय राऊत

shiv sena mp sanjay raut said compensation for families of farmers who died during year long protest this farmers demand is correct
Farmers Protest: शेतकऱ्यांची, देशाची माफी मागून चालणार नाही, मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबाना आधार देणे गरजेचे - संजय राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली असली तरी अजूनही दिल्लीच्या सिंघू बोर्डवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांनी आपले जीव गमावले आहेत. त्यामुळे मृत शेतकऱ्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. म्हणून आता मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याची मागणी केली जात आहे. या अनुषंगाने शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, ‘शेतकरी करत असलेली मदतीची मागणी चुकीची नाही. शेतकऱ्यांची, देशाची माफी मागून चालणार नाही. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबाना आधार देणे गरजेचे आहे.’

‘मोदी सहृदयी आहेत, ते मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबाना मदत करतील’

आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, ‘गेल्या दीड वर्षांत ७००च्या आसपास शेतकरी आंदोलन स्थळी मरण पावले, आत्महत्या केल्या, सरकारच्या गोळीबारात मारले गेले, लखीमपूरमध्ये चिरडून मारण्यात आले. हे सर्वजण तीन कृषी कायद्यांविरोधात लढत होते. केंद्र सरकारने कायदे मागे घेतले. सरकारला आपली चुक समजली. मात्र या चुकीमुळे ७०० बळी गेले हे सगळे शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांचे कुटुंब उघड्यावर पडलेले आहे.
त्याच्यामुळे केंद्र सरकारने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कुटुंबाना मदत करा अशी मागणी होत असेल तर त्यात काही चुकीचे नाही. कारण पीएम केअर फंडामध्ये अमर्याद पैसे पडलेले आहेत. बेहिशोबी पैसे पडले आहेत, त्यातूनही मदत करा. शेतकऱ्यांची, देशाची माफी मागून चालणार नाही ७०० कुटुंबाना आधार देणे गरजेचे आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी सहृदयी आहेत आणि ते मदत करतील याची खात्री आहे.’

‘मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीत सुधारणा होतेय’

 

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजूनही रुग्णालयात आहेत. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. काल मी दूरध्वनीवरून त्यांच्याशी चर्चा केली. लवकरच ते घरी जातील. मुख्यमंत्र्यांवरील शस्त्रक्रिया हा नाजूक विषय आहे, त्यांनी पूर्ण आराम करूनच कामाला लागावं,’ असे संजय राऊत म्हणाले


हेही वाचा – एसटी संपाचा तिढा कायम, २३८ कर्मचार्‍यांची सेवा समाप्त तर २७७६ हजार निलंबित