घरताज्या घडामोडीसमृद्धी मार्गाचे कंत्राट मिळवण्यासाठी शिवसेनेच्या खासदाराची मुख्यमंत्री ठाकरेंच्या नावाने कंत्राटदाराला दमदाटी

समृद्धी मार्गाचे कंत्राट मिळवण्यासाठी शिवसेनेच्या खासदाराची मुख्यमंत्री ठाकरेंच्या नावाने कंत्राटदाराला दमदाटी

Subscribe

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी मार्गाच्या प्रकल्पावर विरोधकांनी चांगलीच टीका केली होती. युती सरकार सत्तेत असताना शिवसेनेनेही शेतकऱ्यांची बाजू उचलून धरत जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी प्रकल्पाचा काही काळ विरोध केला होता. मात्र महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर समृद्धी महामार्गाचे नाव शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे देऊन हाच मार्ग पुढे कार्यान्वयित करण्यात आला. मात्र सत्तेत येताच शिवसेनेचे खासदार समृद्धी महामार्गाचे कंत्राट मिळवण्यासाठी इतर कंत्राटदारांना धमकावत आहेत. विदर्भातील शिवसेनेच्या एका खासदाराने रस्त्याचे कंत्राट मिळवण्यासाठी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव घेत कंत्राटदाराला दमदाटी केली. या दमदाटीची कॉल रेकॉर्डिंग सध्या व्हायरल होत असून हे संभाषण ऑक्टोबर महिन्यातील आहे.

व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये खासदारांचा एक कार्यकर्ता समृद्धी महामार्गाचे कंत्राट मिळालेल्या एका कंत्राटदाराला फोन करतो. युसुफ भाई नाव असलेल्या कंत्राटदाराला हा कार्यकर्ता खासदार तुमच्याशी बोलणार असल्याचे सांगत खासदारांचा कॉल जोडून घेतो. पलीकडून खासदार कंत्राटदाराला थेट काम बंद करण्याचा आदेश देतात. मात्र कंत्राटदार आपण भेटून चर्चा करु, असे वारंवार सांगतो. त्यामुळे भडकलेले खासदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच अंतिम आदेश असून त्यांच्यापुढे कंत्राटदार कंपनीचे देखील काहीच चालणार नसल्याचा दम देतात.

- Advertisement -

खासदार – कंत्राटदार संभाषणाची कॉल रेकॉर्डिंग ऐका – 

 

आपलं महानगरने संबंधित कंत्राटदाराशी फोनवरुन चर्चा करत या व्हायरल झालेल्या या ऑडिओबद्दलची सत्यता जाणून घेतली. त्याने सांगितले की, “माझे आणि खासदारांचे यांच्यातील संभाषण ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील आहे. मला खासदारांकडून फोन आला होता. मी करत असलेले काम करु नये, अशी समज मला खासदारांकडून देण्यात आली.”

- Advertisement -

या कॉल रेकॉर्डिंगबाबत आपलं महानगर कोणताही दावा करत नाही. खासदारांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव घेऊन कंत्राट मिळवण्याचा प्रयत्न करणे योग्य आहे का? असा प्रश्न मात्र आता सामान्य लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर ही रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर लोकांकडून संबंधित खासदारांवर कारवाईची मागणी होत आहे. तर काही लोकांनी या रेकॉर्डिंगमध्ये बोलणारी व्यक्ती खरंच खासदार आहे की खासदार असल्याचे भासवत आहे? याचीही पोलिसांनी चौकशी केली पाहीजे. जर हे तोतयागिरीचे प्रकरण असेल तर सदर तोतया खासदाराला अटक करावी? अशी प्रतिक्रिया काहींनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -