घरमहाराष्ट्र'हिंमत असेल तर निलेश-नितेश यांनी खुल्या मैदानात यावं'; राणेंच्या सुपुत्रांना सेनेचं खुलं...

‘हिंमत असेल तर निलेश-नितेश यांनी खुल्या मैदानात यावं’; राणेंच्या सुपुत्रांना सेनेचं खुलं आव्हान

Subscribe

शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनी सिंधुदुर्गात झालेल्या शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमधील वाद मिटला नसल्याचे चिन्हं आहेत. कुडाळ येथे झालेल्या राड्यानंतर भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या सुपुत्र नितेश आणि निलेश राणे यांनी प्रत्युत्तर देऊ असं म्हटलं होतं. यावर आता शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी राणेंच्या दोन्ही सुपुत्रांना खुलं आव्हान दिलं आहे. हिंमत असेल तर निलेश-नितेश यांनी खुल्या मैदानात यावं, असं आव्हान नाईक यांनी दिलं आहे.

वैभव नाईक यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी निलेश आणि नितेश राणेंवर टीका करताना खुलं आव्हान दिलं. शिवसेना आणि राणे कुटुंबाचा वाद सर्वांना परिचित आहे. नारायण राणे आणि त्यांचे दोन सुपुत्र नेहमी शिवसेनेवर टीका करत असतात. तर शिवसेनेकडूनही सातत्याने राणे पिता-पूत्रांना शह देण्याचा प्रयत्न कोकणात सुरू असतो.

- Advertisement -

वैभव नाईक यांनी काय म्हटलंय?

“कुडाळच्या रणांगणात कुणी कुणाला प्रसाद दिला, हे नितेश राणेंना मुंबईतल्या ‘अधीश’ बंगल्यात बसुन समजणार नाही. त्यासाठी त्यांनी आज षंढपणा सोडून कुडाळच्या रणांगणात उतरण्याची हिंमत दाखवायला हवी होती. म्हणजे त्यांना सुद्धा शिवप्रसादाची चव चाखायला मिळाली असती. दहा वर्षापुर्वी वेंगुर्ला शहरात झालेल्या राड्यामध्ये नितेश राणेंनी शिवप्रसादाची चव चाखली होती. त्यावेळी शिवसैनिकांना घाबरून कार्यालयात शटर ओढुन लपून बसलेले नितेश राणे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. तरण्याबांड मुलाची “बाबा मला वाचवा…” अशी मदतीची आर्त हाक ऐकुन शेवटी म्हाताऱ्या बापाला लाठ्या काठ्या, सोड्याची बॉटल, तलवारी घेऊन मैदानात उतरावे लागले होते. एका बापासाठी यापेक्षा वेगळे दुर्दैव ते कोणते…? शिवसैनिकांशी मैदानात सामना होतो तेव्हा वडीलांच्या मागे लपून मदतीची याचना करणाऱ्या नितेश राणेंसारख्या भित्र्या आणि पळपुट्या मुलाने घरात बसुन शिवसेनेसमोर फूसक्या वल्गना करू नयेत. ट्विटरवर बसुन टिवटिव करण्याव्यतिरिक्त ते कोणत्याही रस्त्यावरच्या लढाईत उतरू शकत नाहीत, हे एव्हाना त्यांच्या कार्यकर्त्यांनाही कळून चुकले आहे.”

“त्यांच्यासारखीच गत त्यांचे मोठे बंधू असलेल्या निलेश राणेंची आहे. कोणत्याही आंदोलनात किंवा राड्यात नेतृत्व करायची किंवा हाणामारी करायची वेळ आली की निलेश व नितेश हे दोघेही बंधु शेपूट आत घालून पळ काढतात आणि बिळात जावून लपतात. नेहमीच कार्यकर्त्यांना मार खाण्यासाठी मैदानात सोडून हे दोघेही भाऊ पळपुटेपणा करतात. इतिहासात दुसऱ्या बाजीरावाची नोंद ‘पळपुटा बाजीराव’ अशी झाली होती. सिंधुदुर्गाचा राजकीय इतिहास लिहिला जाईल तेव्हा राणे बंधूंची नोंद ‘पळपुटे राणे’ अशीच केली जाईल. दोघेही राणे बंधू फक्त ट्विटरवर बसुन फुकाच्या वल्गना करू शकतात. प्रत्यक्षात ते इतके भित्रे आहेत की शिवसैनिकांच्या भितीने काळे कपडे घातलेल्या खासगी सुरक्षारक्षकांच्या दोन ते तीन बोलेरो गाड्या घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिरत असतात. शिवसैनिकांचा खुल्या मैदानात सामना करण्याची या दोघाही भावांची कधीच हिंमत होणार नाही. जेव्हा डंपर आंदोलनावेळी पोलिसांनी चोप देण्यास सुरुवात केली तेव्हा स्टंटबाजी करणारे नितेश राणे कार्यकर्त्यांच्या मागे दडून बसले. त्यांचा त्यावेळचा लपलेला फोटो सोशल मिडियात सर्वत्र वायरल झाला होता. त्याच डंपर आंदोलनात पोलिसांनी जेव्हा शिवसैनिकांवर लाठीमार केला, तेव्हा मी शिवसैनिकांसोबत पोलिसांचा मार खाल्ला परंतु कुठेही लपलो नाही किंवा आंदोलन सोडून पळालो नाही. २०१३ साली कणकवली शहरात जेव्हा आमनेसामने राडा झाला तेव्हा शिवसैनिकांसोबत मी स्वतःसुद्धा जिल्हा पोलीस अधीक्षकांना जाऊन कशा प्रकारे भिडलो हे टेलिव्हिजनवर संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. आमचा इतिहास हा प्रत्यक्ष खुल्या मैदानात जावून भिडण्याचा आहे. तर नितेश राणेंचा राजकीय इतिहास हा पळपुटेपणा करण्याचा आहे. शिवसेनेचा जन्म हाच मुळी आंदोलनातून झालाय. त्यामुळे शिवसैनिकांना मैदानात उतरून संघर्ष करणे शिकवावे लागत नाही. आज सुद्धा मी माझ्या शिवसैनिकांसोबत राणेंच्या पेट्रोल पंपावर स्वतःच घुसलो आणि मग भाजप कार्यकर्त्यांसोबत आमची बाचाबाची झाली. वाघाला शिकार करण्यासाठी शत्रूचाही इलाका चालतो. त्यामुळे मी नितेश राणे आणि निलेश राणे या दोघांनाही खुले आव्हान देतो की ट्विटरवर टिवटिव करायची सोडून द्या आणि तुम्ही दोघेही भाऊ एकदा काळ्या गणवेशातील अंगरक्षक बाजुला ठेवून खुल्या मैदानात उतरायची हिंमत दाखवा…! तुमचा दोघांचाही सामना करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने मी एकटाच येईन…!! निलेश राणे आणि नितेश राणे या दोघांनीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या आवडीचे ठिकाण निवडावे आणि शिवसेनेविरोधात एकदा खुल्या मैदानात उतरून दाखवावे. ऊठसूट शिवसेना पक्षनेतृत्वावर ट्विटरच्या माध्यमातून गरळ ओकणाऱ्या राणे बंधूंना शिवसैनिक खुल्या मैदानात जन्माची अद्दल घडवतील. शिवसैनिक नेमके कशा पद्धतीने प्रसादाचे वाटप करतात त्याची चव दोघाही भावांना निश्चितपणे चाखायला मिळेल. फक्त शिवसैनिकांनी प्रसाद वाटप करायला सुरुवात केली की दोघांनीही पळपुटेपणा करून वडीलांच्या आडोशाला लपू नका. शेवटपर्यंत मैदानात ठामपणे उभे राहून बाळासाहेबांच्या शिवसैनिकांचा प्रतिकार करावा. पाहिजे तर नारायण राणेंना शिवप्रसाद पार्सल करून बंगल्यावर पाठवण्याची व्यवस्था शिवसैनिकांच्या वतीने करण्यात येईल.”

- Advertisement -

हिंमत असेल तर निलेश-नितेश या दोघा भावांनी एकदा खुल्या मैदानात उतरावे…! – आमदार वैभव नाईक

कुडाळच्या…

Posted by Vaibhav Vijay Naik on Saturday, 19 June 2021

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -