घरठाणेLok Sabha 2024 : ठाणे लोकसभेसाठी शिवसेनेचाच उमेदवार, दीपक केसरकरांच्या विधानाने संभ्रम...

Lok Sabha 2024 : ठाणे लोकसभेसाठी शिवसेनेचाच उमेदवार, दीपक केसरकरांच्या विधानाने संभ्रम वाढला

Subscribe

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्राबल्य असल्याने लोकसभेला आपल्याच पक्षाचा उमेदवार असेल, असा दावा स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. अशातच आता ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेलाच मिळेल, असा दावा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी देखील केला आहे. त्यामुळे या जागेवरून शिवसेना आणि भाजपा यांच्यात रस्सीखेच पाहावयास मिळत आहे. ठाणे लोकसभा मतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन शिबीर सोमवारी ऐरोली येथील हेगडे भवन येथे पार पडले. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी मंत्री दीपक केसरकर त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गटाचे प्रदेश समन्वयक नरेश मस्के, आमदार रवींद्र फाटक, शिवसेना उपनेते विजय नाहाटा, शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले उपस्थित होते. (Shiv Sena own candidate for Thane Lok Sabha, Deepak Kesarkar statement caused confusion)

हेही वाचा… MNS-BJP : मनसेने भाजपाचे प्रस्ताव नाकारले, युतीमध्ये सहभागी होण्याची चर्चा फिस्कटली?

- Advertisement -

यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री केसरकर यांनी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी शिवसेनेने राज्यात कंबर कसली असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी केलेली विकास कामे, शिंदेंच्या कार्यपद्धतीची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून मोदींचे हात बळकट करावे, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. ठाणे लोकसभेविषयी बोलत असताना केसरकर यांनी उमेदवारी निश्चितीबाबत शिंदे फडणवीस यांच्यामध्ये चर्चा सुरू असून या मतदारसंघावर शिवसेनेचा दावा करत आपलाच उमेदवार निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला. तर वरच्या स्तरावर जो निर्णय होईल त्याला अंतिम मानून काम करणार असल्याचेही केसरकरांकडून सांगण्यात आले.

यावेळी नरेश मस्के यांनी राजन विचारे यांच्यावर टीका करताना ज्यावेळी विचारे देवाची पूजा करतात त्यावेळी एकीकडे हातात घंटी आणि दुसरीकडे तोंडातून शिव्या सुरू असतात असा गंभीर आरोप केला. शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत असणारे काम आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सुरू असून पुन्हा पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी विराजमान होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

शिवसेना उपनेते विजय नाहाटा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजवर केंद्र सरकारकडून सर्वाधिक निधी मिळवण्यात यश मिळवले आहे. सर्वसामान्यांसाठी 24 तास तत्पर असणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळे आता राज्यात शिवसेनेची ताकद वाढली असून लोकसभेत मुख्यमंत्री शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी आणि महायुतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाला लागण्याची आवाहन केले.

शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी ठाणे लोकसभा हा मुळापासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी ज्याला उमेदवारी देतील त्याला आपण निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी असे सांगत कार्यकर्त्यांनी जर हलगर्जीपणा केला तर त्यांना पदावरून हटवण्यात येईल असा इशाराही चौगुले यांच्याकडून देण्यात आला. ठाणे लोकसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने महायुतीचा उमेदवार निवडून येईल अशा शब्द चौगुले यांनी मंत्री दीपक केसरकर आणि मान्यवरांना मार्गदर्शन करताना दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -