चिन्ह गोठण्याची शिवसेना पक्षप्रमुखांना भीती?

नव्या चिन्हासाठी तयार राहण्याच्या आवाहनानंतर विविध चर्चांना उधाण

सर्वोच्च न्यायालयातील आमदारांच्या अपात्रतेविरोधातील लढाई जिंकल्यावर शिंदे गटाकडून शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर दावा करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास शिवसेनेने कायदेशीर लढाईची तयारीही केली आहे, परंतु या कायदेशीर लढाईदरम्यान निवडणूक आयोगाकडून चिन्ह गोठवण्यातही येऊ शकते. चिन्ह गोठवण्याची शिवसेना पक्षप्रमुखांना भीती वाटत असल्यामुळेच नव्या चिन्हासाठी तयार राहण्याचे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले का, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.

राजकीय वर्तुळात सध्या या विषयावर विविध चर्चांना उधाण आले आहे. कारण निवडणूक चिन्ह गोठवल्यास शिवसेनेला पुढील निवडणुकांमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भीतीपोटीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नव्या चिन्हासाठी तयार राहण्याचे आवाहन शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केल्याचे बोलले जाते.

आतापर्यंत राजकारणात काही राजकीय पक्षांची निवडणूक चिन्ह गोठवण्याची अनेक उदाहरणे आहेत. खासदार रामविलास पासवान यांचा मृत्यू झाल्यानंतर काका-पुतण्यातील वादात लोक जनशक्ती पक्षाचे तुकडे झाले. कायदेशीर वादात त्यांच्या पक्षाचे ‘बंगला’ हे चिन्ह गोठवण्याचे आदेश देण्यात आले होते, याकडे कायदेतज्ज्ञ उदय वारुंजीकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना नुकतेच लक्ष वेधले आहे.

एआयएडीएमकेत दोनदा वाद
तामिळनाडूतील एआयएडीएमके या पक्षाच्या इतिहासात चिन्हासाठी आजपर्यंत दोन वेळा न्यायालयीन लढाई झाली आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती बघता भविष्यात तीही एक न्यायालयीन लढाई होण्याची शक्यता आहे, तथापि निवडणूक चिन्हाबाबतचे अधिकार निवडणूक आयोगाला आहेत. त्यामुळे हा वाद त्यांच्यापर्यंत गेला तर ते नोटीस बजावतील व दोन्ही पक्षांना बाजू मांडायची संधी देतील. त्यानंतर आयोग अंतिम आदेश देईल. दरम्यानच्या कालावधीत हे चिन्ह गोठवले जावे, अशी मागणी शिंदे गटाकडून होण्याची शक्यता आहे.