माफी मागा, नाहीतर स्वत:लाच जोडे मारा; शिवसेनेची राज्यपालांवर सडकून टीका

shiv sena saamana editorial governor bhagat singh koshyari over chhatrapati shivaji maharaj remarks and slams bjp devendra fadanvis shinde group

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी चांगलेच अडचणीत सापडले आहे. सर्व विरोधी पक्षांकडून त्या वक्तव्यावरून राज्यपालांना घेरण्याचा प्रयत्न होत आहे. अशात आज शिवसेनेचे मुखपत्र सामना अग्रलेखातूनही राज्यपालांवर सडकून टीका करण्यात आली आहे. यासोबत शिंदे गट आणि भाजपवरही निशाणा साधला आहे. शिवरायांचा अपमान करणार्‍यांना महाराष्ट्रासमोर नाक घासून माफी मागावीच लागेल! असं शिवसेनेने म्हटले आहे. (shiv sena saamana editorial governor bhagat singh koshyari over chhatrapati shivaji maharaj remarks and slams bjp devendra fadanvis shinde group)

शिवरायांचा अपमान करण्याच्या पटकथेत महाराष्ट्र भाजप सहभागी आहे. वीर सावरकरांचा अपमान झाला म्हणून संपूर्ण काँग्रेसला व गांधी परिवारास गुन्हेगार ठरवणारे शिवरायांचा अपमान हा एखाद्याचे वैयक्तिक मत आहे, असे सांगतात. हा पळपुटेपणा आहे. अशा पळपुट्यांना राज्यपालांच्या धोतरात बांधून अरबी समुद्रात बुडवायला हवे असे महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेचे वैयक्तिक मत आहे. शिवरायांचा अपमान करणार्‍यांना महाराष्ट्रासमोर नाक घासून माफी मागावीच लागेल! असं शिवसेनेने म्हटले आहे.

वीर सावरकर यांचा राहुल गांधी यांच्याकडून ‘माफीवीर’ असा उल्लेख झाला. महाराष्ट्रात पोहोचलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेतील एका पत्रकार परिषदेत श्री. गांधी यांनी सावरकरांच्या दया याचिकेची कागदपत्रे दाखवून वादळ ओढवून घेतले तेव्हा महाराष्ट्रातील भाजप व त्यांच्या सोबतचा मिंधे गट स्वाभिमान, अपमान वगैरेंच्या नावाने वळवळू लागला, त्यातले काही वळू रस्त्यावर उतरले. त्यांनी ”शिवसेना आता काय करणार?” असे विचारून राहुल गांधी यांना जोडे मारण्याचा उपक्रम सुरू केला. आता हे सर्व जोडे स्वत:च्याच हाताने स्वत:च्याच कानाखाली मारण्याची वेळ या जोडेबाजांवर आली आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेने दिली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा माती खाल्ली व छत्रपती शिवरायांचा अपमान केला. मराठवाडा विद्यापीठातील एका ‘राजकीय’ सोहळ्यात राज्यपालांनी शिवरायांची तुलना नितीन गडकरी यांच्याशी केली. हा विषय तूर्त बाजूला ठेवू, पण ”शिवाजी महाराज हे जुनेपुराणे, कालबाह्य झाले आहेत, छत्रपती हे जुन्या जमान्यातील ‘हीरो’ आहेत” असे विधान करून महाराष्ट्राच्या अस्मितेवर व स्वाभिमानावर पाय ठेवला. हे भयंकरच आहे. महाराष्ट्रात वीर सावरकरांच्या अवमानाचा मुद्दा गाजत असतानाच भाजप व मिंधे गटाचा पाय त्यांच्याच राज्यपालांच्या धोतरात अडकून कपाळमोक्ष झाल्याचे शिवसेनेने म्हटले.

राज्यपालांनी शिवरायांचा अपमान केला त्याच वेळी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांची ‘माफीवीर’ म्हणून टवाळी केली. शिवाजी महाराजांनी औरंगजेबास पाच माफीची पत्रे पाठविल्याचा भलताच इतिहास उकरून काढला व महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ला केला. वीर सावरकरांचा बचाव करताना त्यांनी शिवरायांना ‘माफीवीर’ म्हणून देशातील समस्त शिवराय भक्तांच्या अस्मितेचा पाचोळा करून टाकला. आश्चर्य असे की, वीर सावरकरांच्या निमित्ताने हातात जोडे घेऊन रस्त्यावर उतरणारे भाजपचे शूरवीर व मिंधे गटाचे नरवीर आता कोणत्या बिळात लपून बसले आहेत? असा सवालही शिवसेनेने उपस्थित केला आहे.

”शिवरायांनी औरंगजेबास पाच माफीची पत्रे पाठवली” या विधानाबद्दल भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी, महाराष्ट्रातील भाजप पुढार्‍यांनी शिवतीर्थावर येऊन महाराष्ट्राची माफी मागावी व अशी मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करावी, तरच त्यांचा स्वाभिमान की काय तो महाराष्ट्राला दिसेल. असे आव्हानही शिवसेनेने दिले आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांनी एक घटनाबाह्य, बेकायदेशीर सरकार महाराष्ट्राच्या माथी मारले. त्यांनी राजभवनात पाय ठेवल्यापासून भारतीय घटना व शिवरायांचे विचार अरबी समुद्रात बुडवले. त्यांच्याकडून शिवरायांच्या गौरवाची अपेक्षा काय करणार! शिवाजी महाराजांविषयी चुकीची विधाने करण्याचा सपाटाच त्यांनी लावला आहे. ”समर्थ रामदासांशिवाय शिवाजीला विचारतोय कोण?” असे एक विधान अलीकडे करून याच राज्यपाल महोदयांनी शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हाही महाराष्ट्रात संतापाचा स्फोट झाला. ”मुंबईतून गुजराती-राजस्थानी निघून गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही” असे आणखी एक विधान करून मुंबईतील कष्टकरी, स्वाभिमानी मराठी माणसांचा अपमान त्यांनी केला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बाबतीतही राज्यपालांनी असेच घाणेरडे विधान करून गोंधळ घातला तेव्हा त्यांना माफी मागावी लागली. आता तर त्यांनी थेट शिवाजी महाराजांची चेष्टा आणि टवाळी करण्याचे धारिष्ट्य दाखवले. हे बळ त्यांच्यात आले ते महाराष्ट्रात एक मिंधे आणि बेकायदेशीर सरकारला याच राज्यपालांनी सत्तेवर बसवल्यामुळेच. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होऊनही राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तोंडातून निषेधाचा साधा ‘ब्र’ काढायला तयार नाहीत. अशा शब्दात शिवसेनेच्या ठाकरे गटाने सुनावले आहे.

शिवरायांचे विचार व मार्गदर्शन कालबाह्य झाले आहे, असे भाजपचे लोक उघडपणे बोलतात व असे बोलणारे राज्यपाल महाराष्ट्राला लाभतात हे कोणत्या जन्माचे पाप महाराष्ट्राच्या बोकांडी बसवले आहे? शिवरायांनी औरंगजेबाची माफी मागितली, असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणतात. शिवरायांचा विचार जुना झाला, असे आपले राज्यपाल बरळतात. मग पंतप्रधान मोदी यांनी नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवरायांना समर्पित करण्याचे कारण काय? असा सवालही भाजप सरकारला विचारला आहे.

शिवाजी महाराजांनी गुलामगिरीविरुद्ध तलवार उपसली, पहिले स्वतंत्र हिंदवी स्वराज्य स्थापन केले, अफझलखानापासून औरंगजेबापर्यंत आक्रमकांची थडगी महाराष्ट्रात बांधली. त्याच शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागता आणि गरज संपताच त्याच शिवरायांचा अपमान करता? भाजपचे एक आमदार संजय कुटे यांनी आता जाहीर केले, ”राज्यपालांनी शिवरायांबाबत जे घाणेरडे विधान केले ते त्यांचे वैयक्तिक मत आहे.” घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती व्यक्तिगत मते व्यक्त करू शकत नाही. ती मते राज्याची व राष्ट्राची असतात हे त्या कुटे यांना कोणीतरी सांगायला हवे. स्वत:च्या अंगलट आले की, वैयक्तिक मते. मग राहुल गांधींची मतेही वैयक्तिक ठरवा! अशा शिवरायद्वेषी राज्यपालांकडून ‘मिंधे-फडणवीस’ मंडळाने शपथ घेतली आहे म्हणून अशा राज्यपालांना लगेच हटवा असे सांगण्याचे धाडस तुमच्यात नाही. अशा प्रकारे शिवरायांचा अपमान करण्याच्या पटकथेत महाराष्ट्र भाजप सहभागी आहे. असा आरोपही शिवसेनेच्या ठाकरे गटाने केला आहे.


उत्तर प्रदेशात श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती; प्रेयसीच्या शरीराचे केले 6 तुकडे